By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 09:23 IST
1 / 9कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेस या ट्रेनची सेवा पनवेलपर्यंतच असणार आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार असल्याचे म्हटले जात आहे. 2 / 9मध्य रेल्वेने सीएसएमटी – कल्याण विभागांतर्गत, परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यान प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामानिमित्त विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी – मडगावदरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलवरून सुटतील. 3 / 9कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी धावणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव -सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालवण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजीची गाडी क्रमांक १२१३४ मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल.4 / 9याच दिवशीची गाडी क्रमांक १०१०४ मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालवण्यात येईल. ४ एप्रिलची गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल येथूनच नियोजित वेळेनुसार सुटेल. 5 / 9५ एप्रिलची गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस पनवेल येथूनच नियोजित वेळेनुसार सुटेल. ५ एप्रिलची गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस पनवेल येथूनच नियोजित वेळेनुसार सुटेल.6 / 9५ एप्रिलच्या गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली असून ती ५ एप्रिल रोजी पहाटे ५.४० वाजता सुटेल. ती मूळ वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस ५ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता सोडण्यात येईल. तिचा प्रवास सुमारे साडेसहा तास उशिराने प्रवास सुरू होईल. 7 / 9गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्स्प्रेस ५ एप्रिल रोजी सकाळी ७.५० वाजता सोडण्यात येईल. नियोजित वेळेच्या सुमारे ४० मिनिटे उशिराने रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०११२९ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी ५ एप्रिल रोजी सकाळी ७.१० वाजता सुरू सुटेल.8 / 9ऐनवेळी करण्यात आलेल्या बदलामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ, खर्च आणि शारीरिक त्रास वाढणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतील, असे म्हटले जात आहे. मध्य आणि कोकण रेल्वेवरील महत्त्वाच्या रेल्वेगाड्या पनवेल, ठाणे येथून चालवण्यात येणार असल्याने, प्रवाशांना पर्यायी वाहनाने पनवेल गाठण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील. 9 / 9प्रभादेवी पुलाचे मध्य रेल्वे भागातील पॅनल काढण्यासाठी शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहतील. ठाणे आणि डोंबिवली यादरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्य रात्री १२ वाजता सुरू होणार असून, तो रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.