आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 14:23 IST2023-06-01T14:08:42+5:302023-06-01T14:23:24+5:30
१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत.

१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून लालपरीमुळे गावखेड्यात प्रवास सुखाचा आणि सुकर झाल्याचं सांगितलं. तर, परराज्यातही सेवा दिली असून महामंडळाच्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाचं कौतुकही केलंय.
आपल्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासी सेवेमुळे एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे. आज ग्रामीण भागापासून शहरी भागात देखील प्रवासासाठी एसटीला मोठी पसंती दिली जाते.
विशेष म्हणजे आपल्या शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सूट तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली असून या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यात महाराष्ट्राची एसटी सेवा विस्तारली आहे. या विस्ताराचे संपूर्ण श्रेय महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक, तंत्रज्ञ यांचे आहे.
त्यांनी आपल्या लाडक्या लालपरीला हिरकणी, शिवनेरी, शिवशाही आणि विठाई या नावांसह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि आज स्पर्धात्मक युगात देखील ती भक्कम उभी आहे.
शासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही जीवनवाहिनी अविरत सुखद प्रवास देत राहील. लोकांच्या सुख दुःखात धावून येणाऱ्या आपल्या लालपरीने स्वतःचा अमृत महोत्सव पूर्ण केल्याचा विशेष आनंद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
महाराष्ट्र परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक तसेच प्रवासी बंधू भगिनी यांचे मनापासून अभिनंदन. या ७५ वर्षांच्या प्रवासात आपला मोलाचा वाटा आहे.
आपण यापुढे देखील एसटीची गती कायम ठेवून उत्तम प्रवास सेवा जनतेला देणार, हा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.