...तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार; मुंबई महापालिकेचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:37 AM2021-09-25T09:37:57+5:302021-09-25T09:44:14+5:30

गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.

दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व निर्णय राहतील, असंही शासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच आता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत देखील शाळा सुरु होणार आहेत. मात्र शाळा सुरु करण्यापूर्वी मुंबई महापालिका प्रशासनाचा सावध पवित्रा घेतला आहे. मुंबई महापालिकेचं मुंबईतील कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटवर विशेष लक्ष असणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढला तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. तसेच शिक्षकांसाठी विशेष लसीकरण ड्राईव्ह येत्या काही दिवसांत राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आहे. शुक्रवारी दिवसभरात ४४६ बाधित रुग्ण आढळून आले. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १६ हजार ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्के एवढा आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ११८७ दिवसांवर आला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख ४० हजार ३०७ रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी ४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण सात लाख १६ हजार ९४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चार हजार ८०९ सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी पाच रुग्णांना सहव्याधी होत्या. यापैकी तीन रुग्ण पुरुष आणि तीन रुग्ण महिला होत्या.