UTS वर लोकलचा पास काढणं झालं बंद! तुमच्याकडे असलेल्या जुन्या पासचं काय होणार? वाचा सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:28 IST2026-01-02T11:02:30+5:302026-01-02T11:28:15+5:30
UTS to RailOne App Transfer: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो नोकरदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत, आता सर्व रेल्वे सेवा एकाच ॲपवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

याचाच एक भाग म्हणून, मुंबई लोकलचे मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास काढण्याची सुविधा जुन्या UTS ॲपवरून कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. आता प्रवाशांना पास काढण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केलेले 'रेल वन' हे नवीन ॲप्लिकेशन वापरावे लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांच्या सवयीचे झालेले यूटीएस ॲप आता पूर्णपणे बंद झालेले नाही, मात्र त्याचे स्वरूप बदलले आहे. या ॲपवरून तुम्ही दैनंदिन प्रवासाची अनारक्षित तिकिटे काढू शकता, परंतु 'सीझन तिकीट' म्हणजेच मासिक पास काढण्याचा पर्याय आता तिथून हटवण्यात आला आहे. प्रवाशांनी UTS ॲप उघडल्यास त्यांना आता थेट 'रेल वन' ॲप डाऊनलोड करण्याचा मेसेज दिसत आहे.

रेल्वे मंत्रालयाने 'वन नेशन, वन ॲप' ही संकल्पना राबवण्यासाठी 'रेल वन' हे अष्टपैलू ॲप विकसित केले आहे. या एकाच ॲपमध्ये प्रवाशांना आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग, लोकल पासचे नूतनीकरण, ट्रेनचे लाईव्ह स्टेटस आणि प्लॅटफॉर्म क्रमांक, पीएनआर स्टेटस आणि रिफंडची सुविधा, प्रवासात जेवण ऑर्डर करण्याची सोय या सुविधा मिळतील.

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. १४ जानेवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत, जर तुम्ही 'रेल वन' ॲपवरून तिकीट बुक केले, तर तुम्हाला ३% थेट सवलत मिळणार आहे. ही सवलत आता फक्त आर-वॉलेटपुरती मर्यादित नसून यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावरही मिळणार आहे.

ज्या प्रवाशांनी आधीच UTS ॲपवरून मासिक पास काढले आहेत, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. जोपर्यंत तुमच्या जुन्या पासची मुदत संपत नाही, तोपर्यंत तो पास वैध राहील आणि तुम्ही तिकीट तपासणाऱ्यांना तो दाखवू शकाल. मात्र, पास संपल्यानंतर नवीन पास काढण्यासाठी तुम्हाला 'रेल वन'वरच नोंदणी करावी लागेल.

प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून RailOne ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ओळखपत्राचा तपशील भरून नोंदणी करा. Pass Booking पर्यायावर जाऊन आपला मार्ग आणि कालावधी निवडा. डिजिटल पद्धतीने पेमेंट करून आपला पास मोबाईलमध्ये मिळवा.

ज्या प्रवाशांना मोबाईल ॲप वापरणे शक्य नाही, ते नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊनही आपला पास काढू शकतात.

















