Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात मोठा प्रतिसाद, मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची करा; प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:13 IST

1 / 12
Mumbai Goa Vande Bharat Express Train 20 Coach: आताच्या घडीला कोकण रेल्वेवर नियमित वेळापत्रक सुरू झाले आहे. त्यामुळे ट्रेनच्या फेऱ्यांची संख्या, सेवा आणि वेग यात वाढ झाली आहे. कोकणाचे निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे आणि शांतता यांचा अद्भूत अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. हिवाळी सुट्ट्या, नाताळ, शिमगा, उन्हाळी सुट्टी, पावसाळा, गणपती या कालावधीत कोकणात जाणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढते.
2 / 12
कोकणात जाणाऱ्या ट्रेनची संख्या, फेऱ्या, सेवा वाढवल्या तरीही तिकिटांसाठी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. भारतीय रेल्वेत सध्या वंदे भारत ट्रेन ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. संपूर्ण देशात विविध मार्गांवर जवळपास १६० वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.
3 / 12
मुंबईहून गोव्यात जाण्यासाठी बहुसंख्य प्रवासी वंदे भारत ट्रेनला पसंती देतात. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आताच्या घडीला ८ कोचची आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि मागणी असूनही अद्याप तरी या ट्रेनचे कोच जैसे थे आहेत. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन ही २० कोचची करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली आहे.
4 / 12
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून या रेल्वेगाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. देश – विदेशातील पर्यटकांना आरामदायी, वेगवान प्रवासाची अनुभूती मिळत असल्याने वंदे भारत पर्यटकांच्या पसंतीस उतरली. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त होऊन प्रतीक्षा यादी लगेचच सुरू होते. सध्याची ८ कोचची रचना अत्यंत अपुरी असल्याचे म्हटले जात आहे.
5 / 12
हिवाळ्यातील सुट्ट्या, नाताळ, नवीन वर्षाचे आगमन या कालावधीत पर्यटकांची कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. स्वस्त आणि वेगवान प्रवास असल्याने, पर्यटक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु, वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे कमी असल्याने, प्रवाशांना इच्छित दिवसाचे आरक्षित तिकीट मिळत नाही.
6 / 12
रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे वाढविल्यास महसूलात प्रचंड वाढ होईल. तसेच प्रवाशांनाही फायदेशीर ठरेल, असे म्हटले जात आहे. जालना – सीएसएमटी आणि सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसच्या रॅकच्या प्राथमिक देखभालीचे काम नांदेड विभागात हस्तांतरित केले आहे. त्यामुळे मुंबईत वंदे भारतचे रेक उभे करण्यास जागा उपलब्ध झाली आहे.
7 / 12
सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ झाली नाही. त्यामुळे लाखो प्रवाशांना सतत गैरसोयीचा सामना करावा लागतो. ट्रेन क्रमांक २२२२९/२२२३० सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची मालकी आणि प्राथमिक देखभाल (मडगाव) कोकण रेल्वेकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जेणेकरून येथून २० डब्यांची वंदे भारत धावणे सोयीस्कर होईल.
8 / 12
मडगाव येथील आवश्यक देखभाल, पायाभूत सुविधा प्राधान्याने विकसित कराव्यात, अशीही मागणी केली जात आहे. गणेशोत्सवात तात्पुरत्या कालावधीसाठी सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला १६ डबे जोडले होते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत झाली होती. आता नाताळ आणि नववर्षानिमित्त प्रवाशांची मागणी वाढेल. त्यामुळे या वंदे भारत रेल्वेगाडीच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
9 / 12
मुंबई-कोकण रेल्वे अंतर वेगाने पार करणाऱ्या अगदी मोजक्या मेल-एक्सप्रेस आहेत. 'वंदे भारत'चा प्रवास आरामदायी आणि सुखद आहे. या मार्गावर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी आणि मडगाव तेजस या रेल्वेगाड्यांना १६ डबे आहेत. केवळ मुंबई-मडगाव वंदे भारतला ८ डबे आहेत.
10 / 12
मुंबई-मडगाव 'वंदे भारत'चे आरक्षण १०० टक्क्यांहून अधिक असल्याने प्रवासी, संघटना आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या गाडीचे डबे वाढवण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे लावून धरली होती. वाढीव कोचच्या मडगाव 'वंदे भारत' मधून प्रवास करण्यासाठी कोकणवासीयांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
11 / 12
मुंबई-मडगाव 'वंदे भारत'चे आरक्षण १०० टक्क्यांहून अधिक असल्याने प्रवासी, संघटना आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या गाडीचे डबे वाढवण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे लावून धरली होती. वाढीव कोचच्या मडगाव 'वंदे भारत' मधून प्रवास करण्यासाठी कोकणवासीयांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
12 / 12
सद्यस्थितीत २० डब्यांच्या 'वंदे भारत'च्या देखभालीची कोणतीही सुविधा मध्य आणि कोकण रेल्वेकडे नाही. यामुळे वाडीबंदरचे काम पूर्ण झाल्यावरच वाढीव डब्यांसह मडगाव 'वंदे भारत' चालवण्याचा मार्ग खुला होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसKonkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकणTravel Tipsट्रॅव्हल टिप्सIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीMumbaiमुंबईgoaगोवाcentral railwayमध्य रेल्वे