Guru Maa Kanchan Giri Meets Raj Thackeray: राज ठाकरेंची भेट घेणाऱ्या गुरु माँ कांचनगिरी कोण आहेत? पाहा, लाल चौक ते हिंदुराष्ट्रपर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:26 PM2021-10-18T15:26:14+5:302021-10-18T15:33:55+5:30

Guru Maa Kanchan Giri Meets Raj Thackeray: गुरु माँ कांचन गिरी आणि जगत्गुरू सूर्याचार्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली.

कोरोना संकट काळात अनेकविध क्षेत्रातील, स्तरांतील व्यक्ती, मंडळे, संस्था यांनी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्याचे सर्वांनीच पाहिले. त्यात दिवसेंदिवस भर पडत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

आपल्या समस्या, अडचणी घेऊन आलेल्यांना राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींचे प्रश्नही सुटले. या घडामोडींमुळे वर्षा किंवा मातोश्री यांच्यापेक्षा कृष्णकुंज लोकांना अधिक जवळचा वाटू लागल्याची कुजबूजही राजकीय वर्तुळात झाली. यावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले.

यातच आता कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. गुरु माँ साध्वी कांचनगिरी यांनी हिंदुराष्ट्राच्या स्थापनेचे अभियान हाती घेतले असून, यासंदर्भात त्यांनी राज ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.

गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अलीकडेच देश बचाओ आंदोलन सुरू केले होते. आता त्या हिंदुराष्ट्र स्थापनेच्या संकल्पनेसाठी लढत आहेत.

गुरु माँ कांचन गिरी यांनी जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती. तसेच भारत हिंदू राष्ट्र व्हावे म्हणून गुरु माँ कांचन गिरी यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यात त्या संत समाजाशीही चर्चा करणार आहेत.

महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली गुरु माँ कांचन गिरी यांनी हे अभियान सुरू केले असून, देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्रही त्यांनी सुरू केले आहे.

आधी महाराष्ट्र आणि नंतर मध्य प्रदेशात जाणार आहे. या दौऱ्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन लाल चौकात तिरंगा फडकवणार असल्याचे गुरु माँ कांचन गिरी यांनी जाहीर केले आहे. सन १९९१ पासून त्या युरोपीय देशात भारतीय सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत.

गेल्या २० वर्षांपासून त्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही हिंदू धर्माचा प्रचार करत असून, महाकाल मानव सेवान समितीच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी जागृतीही त्यांनी केली आहे.

गुरु माँ कांचन गिरी महिलांच्या प्रश्नांवरही काम करत असून, महिलांच्या चुकीच्या साक्षीमुळे ज्या पुरुषांना फसवले गेले आहेत. त्या पुरुषांना न्याय देण्याचे कामही त्या करतात.

आत्महत्या करणाऱ्यांना या मार्गावरून न जाण्यासाठीही गुरु माँ कांचन गिरी प्रयत्न करत असतात. आगामी काळात धर्म ध्वज यात्रा सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.