50 वर्षांच्या कार्यकाळात असं कधी घडलंच नाही, राज्यपालांवर नाराज शरद प'वार'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 03:18 PM2021-01-22T15:18:43+5:302021-01-22T15:29:25+5:30

केंद्र सरकारने साखरेचा खरेदी दर वाढवावा यासाठी विविध राज्यांतील साखर उद्योगांशी संबंधित लोकांचे शिष्टमंडळ राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात केंद्र सरकारला भेटणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना, मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. पवार म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्र्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी कांही भाष्य करू इच्छित नाही. परंतू दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देवूनही तिथे कोणतीच स्थगिती नाही आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा अनुभव येत आहे.

राज्य सरकार या विषयांत गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ याप्रकरणी न्यायालयात ताकदीने बाजू मांडतील अशी व्यवस्था केली आहे. तसेच, राज्यपालांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने शिफारस करून दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची नांवे राज्यपालांनी अडवून ठेवणे असे मागच्या ५० वर्षाच्या राजकारणात कधी घडले नाही परंतू यावेळेलाच कांहीतरी वेगळे घडले आहे अशी टीका शरद पवार यांनी केली.

पवार म्हणाले, माझ्या मागच्या ५० वर्षाच्या काळात असे कधीच घडल्याचे मला आठवत नाही. एकदा राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून प्रस्ताव पाठवला की तो राज्यपाल मंजूर करत असत. परंतू तसे यावेळेला घडलेले नाही. त्यामुळे या आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी 2 महिन्यांपूर्वीच बंद लिफाप्यात सादर केली आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप ही नियुक्ती केली नाही.

राज्य सरकारकडून तत्पूर्वीही १२ नावे देण्यात आली होती. मात्र, त्यावर आक्षेप घेत ती यादी फेटाळली होती. दरम्यान, त्यानंतर सर्व बाबींची पूर्तता करुन ही नवी यादी दिलेली आहे. राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी भेट घेत १२ जणांची यादी सादर केली. मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.

तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे, खासदार शरद पवार यांनी राज्यपालांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपालांकडे शिवसेनेच्या 4, राष्ट्रवादीच्या 4 आणि काँग्रेसच्या 4 उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. त्यामध्ये, उर्मिला मांतोंडकर, राजू शेट्टी, आनंद शिंदे, एकनाथ खडसे, नितीन बानगुडे पाटील यांचाही समावेश आहे.