मुसळधार पावसानं मुंबईची झाली तुंबई, अनेक भागात साचलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 03:36 PM2019-08-03T15:36:10+5:302019-08-03T15:45:18+5:30

मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून पावसानं जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच आज आणि उद्या कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या दोन दिवसांत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांनी देखील काळजी घेण्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय नियंत्रण कक्षाचे आवाहन केले आहे.

मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज शनिवार ३ ऑगस्ट २०१९ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी कळविले आहे.

अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही बोरीकर यांनी केले आहे.

मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे.

मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.

मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.

दरम्यान, ३ आणि ४ ऑगस्ट रोजी पुणे आणि सातारा जिल्ह्णात अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय ५ ऑगस्टपर्यंत गोवा आणि कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.