BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:23 IST2025-10-08T16:46:37+5:302025-10-08T17:23:31+5:30
BMC Election 2025 Latest Update: दीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीमुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पण, या निवडणुकीत नुकतीच १८ वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदान करता येणार नाही.

ज्या मुंबईकर तरुणांनी नुकतीच वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदारांची नोंदणी करण्यासाठी असलेल्या कट-ऑफ तारखेमुळे हा अडथळा निर्माण झाला असून, यामुळे शहरातल्या अनेक जेन झी मतदारांना मोठा फटका बसणार आहे.
इंडिया टुडे वृत्तवाहिनीने याबद्दलचे वृत्त दिले आहे. अनेक नवीन मतदारांनी तक्रारी केल्या आहेत की त्यांना निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करताना अडचणी येत आहेत. ज्यांची जन्मतारीख १ ऑक्टोबर २००६ नंतरची आहे, अशा १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची मतदार नोंदणी स्वीकारली जात नाहीये.
यामागचे कारणही राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मंदार पारकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
मंदार पारकर यांनी सांगितले की, "मतदार नोंदणीसाठीची अंतिम तारीख (कट-ऑफ डेट) मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर मतदार यादीच्या पुनरीक्षणाची कोणतीही विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली नाही."
पारकर म्हणाले, "नवीन मतदारांसाठीची मतदार यादी प्रक्रिया सध्या गोठवली आहे. या कारणामुळे महाराष्ट्रात सुमारे १.८० लाख तरुणांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे."
सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना, ज्यांचा कार्यकाळ संपत आला आहे, त्यांना ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्यांदा मतदान करू इच्छिणाऱ्या तरुणांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे माजी नेते आणि BMC मधील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. अनेक कुटुंबांनी याविषयी तक्रारी केल्या असून, ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.