युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:47 IST
1 / 10महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी ठाकरे बंधू युतीने नवीन कलाटणी मिळाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजकीय मंचावर एकत्रितपणे आल्याने गेल्या २० वर्षाचा काळ पुन्हा नव्याने डोळ्यासमोर आला आहे. नोव्हेंबर २००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेच आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करत आहेत.2 / 10राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेत मुंबई महापालिकेसाठी युती झाली आहे. या दोघांसह संपूर्ण ठाकरे कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर वंदन केले. त्यानंतर कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं सांगत राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीची घोषणा केली. 3 / 10राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच पाणी पुलाखालून वाहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मोठा गट ठाकरेंपासून दूर झाला. सध्या शिंदे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर आहेत. तर मनसे सातत्याने निवडणुकीच्या पराभवाला सामोरे जात आहे. त्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत हे दोन्ही बंधू एकत्र आल्याचं बोलले जाते. 4 / 10उद्धवसेना-मनसे हे दोन्ही पक्ष मराठीभोवती राजकारण करत असतात. त्यामुळे या दोघांमध्ये कुठलाही वैचारिक अडथळा नाही. मतांच्या बेरजेचे गणित लक्षात ठेवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत सामोरे जाणार आहेत. मुंबई महापालिकेत ताकदीने उतरून दोन्ही संघटना भाजपासारख्या सत्ताधारी पक्षाला आव्हान देत आहेत. 5 / 10माहितीनुसार, उद्धवसेना मुंबई महापालिकेत २२७ पैकी १४५० ते १५० जागा लढवणार असल्याचं बोलले जाते. तर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६५ ते ७० जागांवर निवडणूक लढवू शकते. ठाकरे बंधू यांच्या युतीत शरद पवारांचीही राष्ट्रवादीही सहभागी होईल अशी चर्चा आहे. जर असे झाले तर राष्ट्रवादीला १० ते १२ जागा मिळू शकतात.6 / 10राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात कोण किती जागा लढवणार हे महत्त्वाचे नसून आमच्यासाठी महाराष्ट्र हित आणि मराठी माणूस महत्त्वाचा आहे. मुंबईचा महापौर मराठी माणूस बसेल आणि तो आमचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 7 / 10२००९ साली राज ठाकरे यांच्या मनसेचे १३ आमदार विजयी झाले होते. या निवडणुकीत मनसेचे यश पाहून अनेकांना धक्का बसला. परंतु त्यानंतर संघटना वाढीकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेची वाताहत झाली. २०१४ आणि २०१९ या विधानसभा निवडणुकीत मनसेला एकमेव आमदार निवडून आला. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत मनसेला खातेही उघडता आले नाही.8 / 10मनसेचा ढासळता आलेख पाहता राज ठाकरे यांना महापालिका निवडणुकीत युती करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात लोकसभा, विधानसभा याठिकाणी फटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही एका पक्षाची साथ हवी होती. त्यामुळे आता हे दोन्ही बंधू राजकीय वर्चस्व राखण्यासाठी एकत्र आले आहेत. 9 / 10तर ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे पण त्यामुळे फार काही राजकीयदृष्ट्या घडणार नाही. पक्षाला निवडणुकीतील आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही युती आहे. यामुळे फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू यांच्यावर टीका केली आहे.10 / 10दरम्यान, युती कुणाचीही कुणाशी झाली तरी महाराष्ट्रात महायुती भक्कमपणे उभी असल्याचा दावा शिंदे यांनी केला. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला जनतेचा कौल मिळाला आहे. मुंबई महापालिकेकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. आता ती कोंबडीच कापून खाण्याचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची युती ही स्वार्थासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधू यांच्यावर केली.