By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:10 IST
1 / 12CSMT Mumbai To Madgaon Goa Vande Bharat Express Train New Time Table: आताच्या घडीला भारताची सर्वांत प्रिमियम, लोकप्रिय, वेगवान आणि आरामदायी ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन. देशातील अनेक राज्यांत वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू असून, प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद या ट्रेनला मिळत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अनेक ट्रेनचे कोच वाढवण्यात आले आहे. 2 / 12मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सीएसएमटी (CSMT Mumbai) स्थानकाहून गोव्यातील मडगाव (Madgaon Goa)स्थानकापर्यंत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस नियमितपणे चालवली जाते. कोकणासह गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जाण्याचा प्लान करत असलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता वंदे भारत ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 3 / 12कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू असते. या कालावधीत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतो. कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा वंदे भारतच्या शंभरहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. 4 / 12मुंबई ते गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतचा प्रवास निवडतात. कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकानुसार, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील तीन दिवस चालवली गेली. 5 / 12गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटते आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचते. गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटते आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचते. 6 / 12परंतु, आता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे नियमित वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर २०२५ पासून मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन शुक्रवार वगळता संपूर्ण आठवडा चालवली जाणार आहे. पावसाळ्यात केवळ तीन दिवस चालणारी ट्रेन आता आठवडाभर चालणार आहे. 7 / 12गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस नियमित वेळापत्रकानुसार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी मुंबईतून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ०१ वाजून १० मिनिटांनी मडगाव गोवा येथे पोहोचेल. 8 / 12तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दुपारी ०२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. त्यामुळे वाढलेल्या फेऱ्याचा प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. 9 / 12दरम्यान, देशभरातील जादा मागणी असलेल्या विविध मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे. पण, मुंबई-गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून, प्रवाशांची मागणी असून, ८ डब्यांच्या सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस डब्यात वाढ करण्यात आली नाही.10 / 12वंदे भारत एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या क्षमतेच्या आधारावर १६ डब्यांच्या तीन वंदे भारत एक्स्प्रेस २० डब्यांची आणि ८ डब्यांच्या चार वंदे भारत एक्स्प्रेस १६ डब्यांच्या केल्या आहेत. यामध्ये मंगळुरु सेंट्रल – तिरुवनंतपुरम सेंट्रल, सिकंदराबाद – तिरुपती आणि चेन्नई एग्मोर – तिरुनेलवेली १६ डब्यांच्या वंदे भारत २० डब्यांच्या केल्या आहेत. तर, मदुराई – बेंगळुरू कॅन्ट, देवघर – वाराणसी, हावडा – राउरकेला आणि इंदूर – नागपूर या ८ डब्यांच्या वंदे भारत १६ डब्यांच्या केल्या आहेत. 11 / 12परंतु, यामध्ये सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला नाही. जून २०२३ मध्ये गोव्यातील आणि कोकण रेल्वेवरील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरून धावण्यास सुरुवात झाली. वंदे भारत सुरू झाल्यापासून या रेल्वेगाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. देशविदेशातील पर्यटकांना आरामदायी, वेगवान प्रवासाची अनुभूती मिळण्यास सुरुवात झाल्याने पर्यटकांच्या ही वंदे भारत पसंतीस पडली. 12 / 12वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त होऊन प्रतीक्षा यादी सुरू होते. त्यामुळे या रेल्वेगाडीला १६ किंवा २० डबे जोडण्याची मागणी जोर धरत आहे. गणेशोत्सव कालावधीत काही दिवसांसाठी सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला १६ डबे जोडण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत मिळाली. हे डबे तात्पुरत्या स्वरुपात जोडण्यात आले होते.