साक्षीदार पलटला, समीर वानखेडेंना महासंचालकांनी दिल्लीला बोलावलं; आर्यन खान प्रकरणात मोठा उलटफेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:43 PM2021-10-25T12:43:50+5:302021-10-25T12:52:38+5:30

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळच वळण मिळालं आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल यानं एनसीबीविरोधात केलेल्या दाव्यामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची मोठी कोंडी झाली आहे. नेमकं काय सुरूय जाणून घेऊयात...

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिकांनी एनसीबी विरोधात मोठी आघाडी उघडलेली असताना आता संजय राऊत यांनीही आर्यन खानचा एक व्हिडिओ समोर आणून खळबळ उडवून दिली आहे. आर्यन खान एनसीबीच्या कार्यालयात फरार किरण गोसावी याच्यासोबत बसला असून फोनवर काहीतरी चर्चा सुरू असल्याचा व्हिडिओ उजेडात आला आहे.

राऊतांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओत आर्यन खान प्रकरणात मनी लाँड्रिंगची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणार फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत.

प्रभाकर साईल यानं क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे.

किरण गोसावी यानं एनसीबीच्या कार्यालयाजवळच सॅम डिसोजा नावाच्या व्यक्तीची भेट घेतली होती आणि त्यांच्या व्यवहारासंबंधी बोलणं सुरू होतं. यात समीर वानखेडे यांना ८ कोटी द्यायचे आहेत, असं बोलणं ऐकल्याचंही प्रभाकर साईल यानं म्हटलं आहे.

एनसीबीच्या या कारवाईचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याच्या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर प्रभाकर साईल आज एनसीबी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईतील गुन्हे शाखेत पोहोचला आहे. समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं प्रभाकर साईल याचं म्हणणं आहे.

दरम्यान, प्रभाकर साईल याच्या दाव्यामुळे एनसीबीची झोप उडालेली दिसत आहे. याच प्रकरणाची एनसीबीच्या महासंचलाकांनीही दखल घेतली आहे. मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना तातडीनं दिल्लीला पाचारण करण्यात आलं आहे.

एनसीबीचे महासंचालक समीर वानखेडे यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे. तसंच प्रभाकर साईल याच्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई केली जाणार की वरिष्ठ त्यांच्या पाठिशी उभं राहणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

समीर वानखेडे आता तातडीनं दिल्ला निघाले असून एनसीबीच्या महासंचालकांसमोर ते आपली बाजू मांडणार आहेत. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर महासंचालक नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांनीही आपल्यावरील सर्व आरोप खोटे असून नवाब मलिकांनी ट्विट केलेले कागदपत्र देखील बनावट असल्याचा दावा केला आहे. याशिवाय त्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही वानखेडे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे संजय राऊत यांनीही आज प्रसार माध्यमांशी बोलताना मी तर आता फक्त एकच व्हिडिओ समोर आणलाय. लवकरच आणखी १० व्हिडिओ समोर आणणार आहे. यात भाजपाचे लोक कुठे-कुठे बसेल ते सगळं उघडकीस आणणार आहे. देशभक्तीच्या मुखवट्याखाली मनी लाँड्रिंगचे धंदे सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

प्रभाकर साईल देखील एनसीबीविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी गेला असून संजय राऊत यांनीही साईल याला सुरक्षा देण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. साईल याच्या तक्रारीमुळे आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे.

Read in English