Join us  

ZP Election 2020 : महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेलाच; राष्ट्रवादीला झालं नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 3:10 PM

ZP Election 2020 : एकंदर या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी बघता राज्यात महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेला अधिक झाल्याचं दिसून येतं

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली. महायुतीच्या माध्यामातून एकत्र निवडणुकीला सामोरे गेलेले शिवसेना-भाजपा मित्रपक्ष मुख्यमंत्रिपदावरुन वेगळे झाले. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची आग्रही मागणी शिवसेनेने लावून धरली तर भाजपानेही आपला हट्ट सोडला नाही. त्यामुळे निकालानंतर हे दोन्ही मित्रपक्ष दुरावले. त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. 

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. याच महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी पूर्ण झाली तर सत्तेची कोणतीही अपेक्षा नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होता आला. मात्र या सर्व सत्तासंघर्षात जास्त जागा मिळूनही राज्यात भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. या घडामोडीनंतर राज्यात झालेल्या ६ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होतं. 

राज्यातील महाविकास आघाडीचे पडसाद स्थानिक पातळीवरही दिसून आले. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला अनपेक्षित यश मिळालं तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसला. राज्यात झालेल्या ६ जिल्हा परिषदेच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर एकूण ३३२ जागांपैकी भाजपाला १०६, काँग्रेसला ७०, शिवसेनेला ४९ तर राष्ट्रवादीला ४६ जागा मिळाल्या आहेत. तर पंचायत समितीच्या एकूण ६६४ जागांपैकी भाजपा १९४, काँग्रेस १४५, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, शिवसेना ११७ जागा विजयी झाल्या आहेत. 

एकंदर या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी बघता राज्यात महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस-शिवसेनेला अधिक झाल्याचं दिसून येतं तर राष्ट्रवादीला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. वाशिम, नागपूर, पालघर वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत सध्यातरी शिवसेना-काँग्रेस या दोन पक्षांना याचा फायदा होताना दिसत आहे. वाशिममध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक १२ जागा मिळाल्या आहेत, गेल्यावेळी राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्या होत्या त्यात ४ जागांची वाढ झाली आहे. तर पालघरमध्येही राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची असणार आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशिवसेनाकाँग्रेसजिल्हा परिषदमहाराष्ट्र विकास आघाडी