ओशिवऱ्यात ओव्हरटेकने घेतला डिलिव्हरी बॉयचा बळी; कारचालक विद्यार्थी पाेलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 02:14 AM2020-12-19T02:14:31+5:302020-12-19T06:57:31+5:30

अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान

Zomato delivery boy dies as overspeeding Mercedes hits scooty in Oshiwara driver held | ओशिवऱ्यात ओव्हरटेकने घेतला डिलिव्हरी बॉयचा बळी; कारचालक विद्यार्थी पाेलिसांच्या ताब्यात

ओशिवऱ्यात ओव्हरटेकने घेतला डिलिव्हरी बॉयचा बळी; कारचालक विद्यार्थी पाेलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

मुंबई : भरधाव वेगातील मर्सिडिज कारने खासगी फूड ॲपच्या डिलिव्हरी बॉयला धडक दिल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ओशिवरा परिसरात घडली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून, ओशिवरा पोलिसांनी कारचालक सैफुर तन्वीर शेख (१९) नामक विद्यार्थ्याला अटक केली आहे.

ओशिवरा, अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील लिंक प्लाझा इमारतीसमोर पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास हा अपघात घडला. शेख त्याच्या मर्सिजिड कारने भरधाव वेगात निघाला होता. मार्गात येणाऱ्या अन्य गाड्यांना ओव्हरटेक करताना अचानक समोरच्या रस्त्यावरून झोमॅटो या खासगी फूड ॲपचा डिलिव्हरी बॉय सतीश गुप्ता (२१) मोटारसायकलवरून येत होता. त्यावेळी शेख याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गुप्ताच्या मोटारसायकलला त्याने जोरदार धडक दिली. शेख कारमधून खाली उतरला आणि त्याने गंभीर जखमी झालेल्या गुप्ताला स्वतःच्या कारमधून हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी शेखला अटक केली. शेख आणि त्याचे मित्र कार रेसिंग करत होते. त्या दरम्यान, हा प्रकार घडल्याचा आरोप असून, पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. गुप्ताचा पुढील महिन्यात वाढदिवस होता, त्या आधीच त्याने जगाचा निरोप घेतल्याने गुप्ता कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

गुप्ताच्या मृत्युबाबत समजताच अभिनेता सोनू सूदने त्याच्या मित्रांना गोंधळ न घालता पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली, तसेच त्याला जी काही मदत हवी असेल ती करण्याचे आश्वासन दिले.

‘शेख नशेत गाडी चालवत नव्हता’
शेख हा विद्यार्थी असून, त्याने अपघातानंतर गुप्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याने नशेत गुप्ताच्या मोटारसायकलला धडक दिली, अशी 
चर्चा सुरू होती. मात्र, यात तथ्य नसल्याचे बांगुरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, रेस लावण्यातून हा सगळा प्रकार घडला आहे का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

‘जस्टिस फॉर सतीश गुप्ता’
सतीश गुप्ता याच्या मृत्यूची माहिती मिळताच, त्याच्या मित्रांनी ओशिवरा पोलीस ठाण्याजवळ त्याच्या नावाचे बॅनर घेऊन गर्दी केली. या बॅनरवर ‘जस्टिस फॉर सतीश गुप्ता’ असे लिहिले होते.

Web Title: Zomato delivery boy dies as overspeeding Mercedes hits scooty in Oshiwara driver held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Zomatoझोमॅटो