Electric Shock Death: महावितरणच्या दुर्लक्षामुळेच विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:50 IST2025-10-16T09:49:18+5:302025-10-16T09:50:08+5:30
Bhandup Electric Shock Death: सदोष जोडणी आणि स्थानिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे.

Electric Shock Death: महावितरणच्या दुर्लक्षामुळेच विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून विजेचा धक्का बसून १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाच्या मृत्यूप्रकरणी भांडूप पोलिसांनी महावितरणच्या सहायक अभियंत्यासह एका तांत्रिक कर्मचाऱ्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा मंगळवारी गुन्हा दाखल केला. सदोष जोडणी आणि स्थानिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे.
१९ ऑगस्ट रोजी दीपक पिल्ले हा तरुण तुंबलेल्या पाण्यातून जात असताना विजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र सखोल तपासात महत्त्वाचे तथ्य पुढे आले.
तक्रारीनंतरही दुर्घटना का घडली?
घटनास्थळी लघुदाब भूमिगत केबलमध्ये बिघाड (पंक्चर) झाल्यामुळे तुंबलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह होता. या केबलची जोडणी आणि देखभाल करण्याची जबाबदारी महावितरणचे सहायक अभियंता संतोष रुद्रशेट्टी आणि तांत्रिक कर्मचारी विकास जाधव यांच्यावर होती. दुकानदार आणि रहिवाशांनी संबंधित ठिकाणी विजेचा धक्का बसत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे वेळोवेळी केल्या होत्या. त्यानंतरही उपाययोजना केली नव्हती. पोलिसांनी उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या निष्कर्षावरून रुद्रशेट्टी व जाधव यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.