Youth Congress to spin; Satyajit Tambe to build new organization again | युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजीत तांबे 

युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजीत तांबे 

मुंबई - राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचा घोळ सुरुच असताना भाजपापाठोपाठ युवक काँग्रेसही संघटन बांधणीच्या कामाला लागली आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशामध्ये युवक काँग्रेसचा मोठा हातभार लागला असून पक्षाला आणखी बळकट करण्याचा संकल्प महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पराभवाने खचून न जाता त्यावर आत्मपरिक्षणपर विचारमंथन करून पुन्हा जोमाने कामास लागण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याऱ्या तरुणांना कॉंग्रेसकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले होते. युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसने अत्यंत आक्रमकपणे विविध उपक्रम राबवले व आंदोलने केली. त्यापैकी सुपर 60,  वेक अप महाराष्ट्र , मैं भी नायक या उपक्रमांना राज्यभरातील युवकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे सर्व उपक्रम राबवताना आणि आंदोलने करताना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून अनेक तरुणांनी युवक काँग्रेसचे काम करण्याची इच्छा दर्शवली होती. 

निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमानंतर सत्यजीत तांबे यांनी ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे युवक कॉंग्रेससाठी काम करण्यास इच्छूक असलेल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन आलेल्या युवक, युवतींशी संवाद साधला. निवडणुकीच्या निकालानंतर युवक काँग्रेसकडे बघण्याचा तरुणांचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे हे जाणवल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार येतात, जातात, संघटना मोठी झाली पाहीजे. पक्ष वाढला पाहीजे, त्यासाठी आमचं काम सुरु झालंय असे सांगून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा पुढील कार्यक्रम हा संघटन बळकटीचा असल्याचे सत्यजीत तांबेंनी स्पष्ट केलं. 

यासाठी सत्यजीत तांबे हे स्वतः राज्यभर दौरे करून युवकांशी संवाद साधणार आहेत आणि जास्तीत जास्त युवकांना युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रभर फिरुन तालुका ते जिल्हापातळीवर युवक काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी इच्छूक तरुणांना  पदाधिकारी होण्याची संधी ते उपलब्ध करून देणार आहेत. अशी माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रीज दत्त आणि प्रवक्ते आनंद सिंग यांनी दिली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Youth Congress to spin; Satyajit Tambe to build new organization again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.