मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारला सुनावले. ठाकरेंचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. काही लोकांची सकाळी मी विधाने ऐकली आहेत. त्यांचे प्रयत्न काय आहेत, हे माझ्या लक्षात येत आहे. मला त्यांना सांगायचं की तुमचंच तोंड भाजेल, अशा शब्दात फडणवीसांनी निशाणा साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "आमचा एकच प्रयत्न आहे की, दोन समाज एकमेकांपुढे येऊ उभे राहिलेले आहेत. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये म्हणून ओबीसी समाजालाही सांगावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल."
आम्हीच मराठा समाजाला न्याय दिलाय -फडणवीस
"गेल्या दहा वर्षामध्येच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय देण्याचे काम झालेले नाही. आरक्षण देण्याचं काम, सारथीचं कामही आम्ही केलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचेही कामही आम्ही सुरू केले", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस म्हणाले, "काहींना ओबीसी-मराठा भांडण लावायचं आहे"
"मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. मराठा समाजाबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. पण, काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत की, हे कसं वाढेल आणि दोन समाजातील लोक एकमेकांसमोर आले पाहिजे. ओबीसी मराठा भांडण लागलं पाहिजे, असे काही लोकांचे प्रयत्न आहेत. काही लोकांची विधाने मी सकाळी बघितली आहेत. त्यांचे प्रयत्न काय आहेत, हे माझ्या लक्षात येत आहेत. मी त्यांना सांगतो की, अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं तोंड भाजेल. हे मला त्यांना सांगायचं आहे", असे म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
"शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपला सामाजिक सलोखा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो, त्या निर्णयाचा दीर्घळाकापर्यंत परिणाम होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय चर्चेतून घ्यायचे असतात. एकाला समोर करायचं, मग दुसऱ्याला नाराज करायचं. मग त्याला समोर आणायचं. अशा प्रकारे लोकांना एकमेकांशी झुंजवणे, हे या सरकारचं धोरण नाही", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.