Mumbai Crime:मुंबईतील लालबाग-काळाचौकी परिसरात आज (शुक्रवारी) सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. ब्रेकअपमुळे मानसिक तणावाखाली असलेल्या एका तरुणाने २४ वर्षीय एक्स-गर्लफ्रेंडवर दिवसाढवळ्या क्रूर हल्ला केला. इतकेच नाही, तर हल्ला केल्यानंतर त्याच तरुणाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या सगळ्या प्रकारामुळे लालबागमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर मोठी खळबळ माजली आहे.
आंबेवाडी येथे राहणाऱ्या सोनू बराय (२४) याचे याच परिसरातील पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रेयसीचे अन्य कोणासोबत संबंध असल्याच्या संशयावरून दोघांचे ब्रेकअप झाले होते. तेव्हापासून सोनू प्रचंड मानसिक तणावात होता आणि तो समेट करण्याचा प्रयत्न करत होता. आज सकाळी सोनूने पीडित तरुणीला भेटायला बोलावले. सुरुवातीला दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. संतापलेल्या सोनूने रस्त्यातच तरुणीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरुणी जवळ असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये पळत गेली. सोनूने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला केला. नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच, सोनूने चाकूने स्वतःचा गळा चिरून घेतला.
दोघे रुग्णालयात दाखल, तरुणाचा मृत्यू
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना तातडीने केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान सोनू बराय याचा मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या जे.जे. रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस आणि पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या नर्सिंग होममध्ये हा प्रकार घडला, तिथे मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता. या घटनेने काळाचौकी परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Web Summary : In Lalbagh, Mumbai, a jilted lover attacked his ex-girlfriend, then killed himself. The girl ran into a nursing home to escape the attack. Both were rushed to the hospital, but the man died. The woman is in critical condition.
Web Summary : मुंबई के लालबाग में एक प्रेमी ने अपनी पूर्व प्रेमिका पर हमला किया और फिर आत्महत्या कर ली। लड़की हमले से बचने के लिए नर्सिंग होम में भाग गई। दोनों को अस्पताल ले जाया गया, लेकिन आदमी की मौत हो गई। महिला गंभीर हालत में है।