मुंबई - फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणीला मारहाण करत तिचा मोबाइल हिसकावल्याची घटना साकीनाका पोलिसांच्या हद्दीत सोमवारी घडली. मात्र, तरुणीने प्रसंगावधान राखत चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पूजा साळुंखे (३१, रा. नवी मुंबई) ही साकीनाका येथील जरीमरी परिसरात कंपनीत नोकरी करते. ती सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास जरीमरी येथील पदपथावरून मोबाइलवर बोलत जात होती. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने पूजाचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यावर त्याने तिला मारहाण केली. ती जखमी होताच तिच्या हातातून फोन खेचून त्याने जरीमरीच्या दिशेने पळ काढला. मात्र, पूजाने जखमी अवस्थेतही त्याचा पाठलाग केला.
आरोपीविरोधात गुन्हा ‘चोर चोर,’ असा तिचा आवाज ऐकून समोरच्या रस्त्याने चालणाऱ्या वाटसरूंनी चोराला पकडून साकीनाका पोलिस ठाण्यात आणले. समीर अन्सारी (२९, रा. हलाव पूल, कुर्ला), असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांना त्याच्याकडे पूजाचा १० हजार रुपये किमतीचा फोन सापडला आहे. अन्सारीविरोधात साकीनाका पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.