या तरुणाने घेतली मुंबईकर महिलांच्या सुरक्षिततेची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 04:38 PM2017-11-06T16:38:25+5:302017-11-06T18:46:04+5:30

मुलींनी मुंबईत रात्री फिरणं किती असुरक्षित आहे याची बोंब न उठवता हा तरूण खरंच त्याबाबत पावलं उचलतोय.

This young man took oath of protecting women from Mumbai | या तरुणाने घेतली मुंबईकर महिलांच्या सुरक्षिततेची शपथ

या तरुणाने घेतली मुंबईकर महिलांच्या सुरक्षिततेची शपथ

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या बातम्या आपण वाचतोय.तिने हा  प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.लोकल प्रवासात स्त्रियांशी अंगलट करणाऱ्यांविरोधात आवाज उठवून त्याने आतापर्यंत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या बातम्या आपण वाचतोय. ट्रेनमध्ये एकजण तरुणीसमोर हस्तमैथून करत होता म्हणून त्या मुलीने चालत्या ट्रेनमधून उडी घेतली होती. त्याआधी चर्चगेट स्थानकावरही एका तरुणीसोबत असाच प्रकार घडला. तिने हा  प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. अशा अनेक घटना ट्रेन,  प्लॅटफॉर्मवर होत राहतात. गर्दीचा फायदा घेणारे, किळसवाणा स्पर्श करणारे, जीवघेण्या दृष्टीने पाहणारे आपल्या आजूबाजूला असतात. त्यांच्याविरोधात आपण काहीच करू शकत नाही म्हणून आपण शांत राहतो. मात्र हीच गोष्ट मुंबईतल्या एका तरुणाने हेरली आणि सुरू केला एक अनोखा उपक्रम. लोकल प्रवासात स्त्रियांशी अंगलट करणाऱ्यांविरोधात आवाज उठवून त्याने आतापर्यंत जवळपास १४० महिलांना न्याय मिळवून दिला आहे. 

मुंबईतल्या एका झोपडपट्टीत वाढलेल्या दिपेश टंकने हा उपक्रम सुरू केलाय. दिपेशचे वडिल लहानपणापासूनच आजारी. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या आईवर होती. आई एक खानावळ चालवायची. दिवसातले तब्बल १२ तास ती या खानावळीत व्यस्त असायची. रात्री यायला थोडा उशीरच व्हायचा. झोपडपट्टीतील मुलांच्या नादाला लागून दिपेशला वाईट वळण लागू नये याकरता त्याच्या आईने अटोकाट प्रयत्न केले.  शिकवण्यासाठी त्याला शाळेतही टाकलं. मात्र १६ व्या वर्षी त्याने शिक्षण सोडलं. आईवर असलेला आर्थिक भार कमी व्हावा म्हणून एका कंपनीत ऑफिस बॉयची नोकरी स्विकारली. तेथे तो मन लावून काम करत होता. सगळ्यांच्या आधी कामावर पोहोचत तर सगळे गेल्यावरच ऑफिसमधून बाहेर पडत असत. त्यानंतर त्याला एका चांगल्या जाहिरात कंपनी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्यामुळे प्रत्येकाप्रमाणेच तोही मुंबई लोकलचा एक अविभाज्य भाग बनला. एकदा रात्री एका स्थानकावर एक ग्रुप एका मुलीला छेडत असल्याचं त्यानं पाहिलं. ग्रुपमध्ये अनेकजण होते, त्यामुळे त्यांना तो एकटा भिडू शकला नसता. म्हणून त्याने पोलिसांना बोलवायचं ठरवलं. रेल्वे पोलिसांनी आधी त्याला हटकलं. मात्र त्यानंतर पोलिस त्याच्यासोबत यायला तयार झाले. मात्र तोवर ते गुंड तेथून निघून गेले होते. त्यानंतर त्याने विचार केला की माझी आईही अशीच रात्रीची घरी एकटी येते, तिलाही अनेकांनी छेडण्याचा प्रयत्न केला असेल. मुंबईतल्या कित्येक मुली उशीराने घरी जातात. त्यांच्यासोबतही असे अनेक प्रकार घडत असतील. म्हणून त्याने एक योजना आखली. दिपेश व त्याच्या मित्रांनी मुंबईतील अनेक स्थानकं पालथी घातली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जवळपास ८५ टक्के स्त्रिया लोकल प्रवाशात लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत. तसंच कित्येक स्त्रिया रात्रीचा प्रवास करायलाही घाबरतात असं त्यांना समजलं. 

हा सगळा प्रकार पोलिसांसमोर जायला हवा मात्र तोही पुराव्यानिशी. म्हणूनच त्याने एक युक्ती आखली. त्याने त्याच्या सनग्लासेसमध्ये कॅमेरा बसवून घेतला. महिलांच्या डब्याजवळ उभा राहून तो प्रत्येक गोष्ट त्याच्या गॉगलच्या कॅमेऱ्यात टिपल्या. प्रत्येक स्त्री एवढ्या अग्नीदिव्यातून प्रवास करत असेल याची त्याला आतापर्यंत कल्पनाच नव्हती. सगळे पुरावे गोळा केल्यानंतर त्याने थेट पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांना सर्व पुरावे दिले. पोलिसांनीही या प्रकरणाला हुशारीने हाताळायचं ठरवलं. पोलिसांच्या ४० जणांच्या टीमने दिपेश आणि त्याच्या मित्रासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक स्थानकातून जाऊन व्हिडिओमध्ये पाहिलेल्या प्रत्येक आरोपीला पोलिसांनी अटक केली. गेल्या ३ वर्षात पोलिसांनी आतापर्यंत १५० आरोपींना अटक केलेली आहे. 

एवढंच नाही तर, दिपेश आता स्वत: वैयक्तिकरित्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या व अत्याचाराच्या समस्या सोडवतो. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पीडित मुलीला न्याय मिळावा याकरता तो स्वत: धडपड करतो. आपल्या समोर अशा अनेक घटना घडतात. मात्र आपण डोळेझाक करत पुढे निघून जातो. पण दिपेशने यावर नवा पायंडा घातला आहे, त्यामुळे त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

सौजन्य - www.kenfolios.com

Web Title: This young man took oath of protecting women from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.