शिवडीत झाड पडल्याने तरुणाचा बळी; एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:15 IST2025-05-30T12:15:02+5:302025-05-30T12:15:02+5:30
चेंबूरमध्येही फांदी पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाले आहेत.

शिवडीत झाड पडल्याने तरुणाचा बळी; एक जखमी
मुंबई : शहर आणि उपनगरात बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. बुधवारी सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ८ या २४ तासांत ३० ठिकाणी झाडे आणि त्यांच्या फांद्या पडल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या. शिवडी येथे किडवाई पोलिस ठाण्यानजीकच्या अँगल सोसायटीतील गुलमोहराचे मोठे झाड बुधवारी रात्री उन्मळून पडल्याने रस्त्यालगतच्या दोन ते तीन वाहनांचे नुकसान झाले. तर, एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी आहे. चेंबूरमध्येही फांदी पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाले आहेत.
बुधवारी शिवडी येथे गुलमोहराचे झाड चालत्या दुचाकीवर पडल्याने रमझान निषाद (२७), बाळकृष्ण कुराई (३३) हे दुचाकीस्वार जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, निषादचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य कुराई याची प्रकृती स्थिर आहे. चेंबूरमधील जैतवन उद्यानाजवळ बुधवारी रात्री झाडाची फांदी पडल्याने हितेश शेरसाया (२२) आणि जयेश बोरा (२२) हे पादचारी जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
घरे, भिंतींचीही पडझड
बुधवारच्या पावसामुळे शहरात दोन व पूर्व उपनगरात दोन ठिकाणी घर, इमारतीचा भाग, भिंत पडण्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे आल्या. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार भायखळा पश्चिमेतील बदलू रामगरी स्ट्रीट, अशरफी मंजिल येथे पाच मजली इमारतीच्या चौथ्या माळ्याच्या गॅलरीचा काही भाग कोसळला.
ही इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत आहे. या घटनेत त्यात खुशमा खातुल (३०) आणि नाझिया खान (३५) जखमी झाल्या. त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले असून, खुशमाची प्रकृती स्थिर, तर नाझियाची प्रकृती गंभीर आहे.
१५ ठिकाणी शॉर्टसकिंट शहरात ९, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात ४, अशा एकूण १५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या तक्रारी आपत्कालीन विभागाकडे आल्या. मात्र, या घटनांमध्ये कुणीही जखमी झाले नाही.