छठपूजेचे साहित्य घेऊन निघालेल्या तरुणाचा बसखाली चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:13 IST2025-10-29T13:13:28+5:302025-10-29T13:13:28+5:30
पवई परिसरातील घटना; बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

छठपूजेचे साहित्य घेऊन निघालेल्या तरुणाचा बसखाली चिरडून मृत्यू
मुंबई : खासगी ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत झालेल्या अपघातात राहुल विश्वकर्मा (२५) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बसच्या टायरखाली त्याचे डोके चिरडले होते. ही दुर्घटना पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार प्रिया विश्वकर्मा (२२) विक्रोळी (पूर्व) येथे आपल्या आई-वडील आणि दोन जुळ्या भावांसह राहतात. मृत राहुल हा प्रियाचा भाऊ असून, एका कुरिअर कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत होता.
प्रियाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी(दि. २७) छठपूजा असल्याने संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विश्वकर्मा कुटुंब पवारवाडी घाट येथे गेले होते. पूजा रात्री ८ वाजेच्या सुमारास संपल्यानंतर ते घरी जाण्यास निघाले. मात्र हातात बरेच साहित्य प्रियाच्या वडिलांनी राहुलला फोन करून तिथे बोलावून घेतले.
राहुल स्कूटीवरून पवारवाडी घाटावर पोहोचला. त्यावेळी प्रिया राहुलसोबत दुचाकीवरून घरी निघाली. रात्री सव्वाआठच्या सुमारास विक्रोळीच्या दिशेने जात असताना, मागून आलेल्या बसने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. यावेळी प्रिया फुटपाथच्या बाजूला फेकली गेली; परंतु राहुल दुर्दैवाने बसच्या समोर पडला. त्याच वेळी बसचे पुढचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. ऐन सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.