Join us
Daily Top 2Weekly Top 5

... तुम्हीच सांगा झोप कशी येईल? दुर्घटनेनंतर 40 तास पोकलेन चालवतोय 'किशोर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 09:47 IST

तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले.

ठळक मुद्देबीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर गेल्या 6 वर्षांपासून जेसीबी आणि पॉकलँड चालवायचं काम करतोय. गावापासून दूर महाडमध्ये सध्या त्याचं काम सुरुय.तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले.

मयूर गलांडे 

मुंबई - २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते... कानठळ्या बसणाऱ्या स्फोटाप्रमाणे आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची धावाधाव सुरू झाली... प्रत्यक्ष घराबाहेर पडल्यानंतर कानी पडला तो फक्त...आक्रोश...काळीज धस्स करणारे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि डोळे विस्फारून पाणावले... भेदरलेल्या नागरिकांना काही काळ काहीच सूचले नाही. डोळ्यासमोर मातीचा डोंगर पाहून मदतीसाठी धावपळ सुरू झाली. याच मदतीसाठीचा एक फोन एल अँड टी कंपनीने ठेका घेतलेल्या पोकलेन मालकाच्या कामगारालाही गेला.  

तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना गती येण्यासाठी माणुसकीला महत्व देत अविरतपणे न थकता, न झोपता अखंडपणे 40 तास पोकलेन चालवण्याचं, काम किशोरने केलंय. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर सध्या महाडमध्ये पोकलँड चालविण्याचे काम करतो. 24 तारखेच्या सायंकाळी ठेकेदाराचा फोन येताच, किशोरने तत्काळ पॉकलेनला चावी देत तारिक गार्डनच्यादिशेने गिअर टाकला. घटनास्थळी पोहोचताच कामाला सुरुवात केली, तब्बल 40 तासांनंतरही त्याचं काम सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढायचंय हे एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आहे.

आम्ही इमारत कोसळलेल्या जागी पोहचताच काम सुरू केलं, तवापासून माझं काम सुरूचय. सिमेंट-मातीचा ढिग बाजूला सारण्याचं आणि अडकलेल्यानांना अलगदपणे वर काढण्याचं काम मी करतोय. ढिगाऱ्याखाली अडकेल्या माणसांना शोधण्यासाठी पोकलेनचा हँण्डल फिरवताना पोटात गोळा येतो. एखादा माणूस मशिनखाली तर येणार नाही ना, याची काळजी घेत मशिन चालवतोय. कालपासून मी 10 डेडबॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यात, ते बघून लय वाईट वाटतंय. पण साहेब, काल एका 4 वर्षाच्या पोराला जिंवत बाहेर काढल्यानंतर मला लय भारी वाटलं, आनंद झाला होता. तो मुलगा जिवंत बाहेर आल्याचं पाहिल्यानंतर कामाचा ताणच गेला, उलट पुन्हा जोमात काम करायला लागल्याचं किशोरनं लोकमतशी बोलताना सांगितलं.

तू 40 तास झालं सलग काम करतोय मग, जराही झोपला नाहीस का? असा प्रश्न केल्यावर मराठवाड्याच्या टोनमध्ये, झोपच नाही ना आली साहेब... तुम्हीच सांगा झोप कशी येईल हे असं पाहिल्यावर? असा प्रतिप्रश्न किशोरने केला. किशोरच्या प्रश्नावर मी निरुत्तर होऊन त्याला पुढचा प्रश्न केला. कालपासून जेवण तरी केलं का नाही मग? त्यावर तो उत्तरला. दुपारी समोसा आणि रात्री खिचडी खाल्लीय. साहेब मी कामातंय ओ मला जास्त बोलता नाही येणार असंही तो म्हणाला. त्यानंतर, जास्त काही न विचारता ... थँक्यू किशोर प्राऊड ऑफ यु म्हणून फोन ठेवला. अजूनही पोकलेन चालवण्याचं त्याचं काम सुरूच आहे, ते कदाचित उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत असंच चालू राहिल.  

VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! १९ तासांनंतर ढिगाऱ्याखालून चिमुकल्याची सुखरुप सुटका

बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर गेल्या 6 वर्षांपासून जेसीबी आणि पोकलेन चालवायचं काम करतोय. गावापासून दूर महाडमध्ये सध्या त्याचं काम सुरुय. मालक सांगेत त्या साईडवर जाऊन काम करावं लागत असल्याचं किशोरनं सांगितलं. किशोर बारावी पास असून बीए फर्स्टला अॅडमिशनही घेतलं होतं. मात्र, कामामुळे जमत नसल्यामुळे परीक्षाच दिली नाही. सध्या ज्या मालकाकडे काम करतो, तो मालक महिन्याला 18 हजार रुपये पगार देत होता, गेल्याच महिन्यात 20 हजार रुपये पगार केल्याचंही त्यानं लोकमतशी बोलताना सांगितलं. किशोरचा फोटो पाहिल्यानंतर त्याचे लालबुंद डोळेच त्याच्या सलग 40 तास कामाची साक्ष देत आहेत. त्यामुळेच, एनडीआरएफच्या जवानांप्रमाणे मला किशोरचं कामही तितकंच निष्ठेचं, माणूसकीचं आणि देशसेवेचं वाटतं.         तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले. बाहेर पडताना चिचकर यांचा पुतण्या आवेश आणि इतर तरुणांनी सुरुवातीला २० जणांना बाहेर काढले आणि इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारतीमधील ८० जण बचावले असून, १४ मृतदेह काढण्यात आले आहेत. मदत कार्याला वेग आला असून, इमारतीचा पडलेला भराव काढण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ टीम, पोलीस, प्रशासनाला परिसरातील नागरिक मदत करत आहेत. तर ज्यांच्या नातेवाइकांचा मृत्यू झाला त्यांचे सांत्वन करत आहेत. या संकट प्रसंगी माणुसकी टिकून असल्याचे अनेकांच्या कृतीतून दिसून येत आहे. त्यापैकीच एक आहे, बीड जिल्ह्याच्या एका छोट्याशा खेड्यातील किशोर लोखंडे  

टॅग्स :रायगडमहाडअपघातइमारत दुर्घटनाबीड