Join us

Lumpy Skin Disease Virus: लम्पी व्हायरस मानवनिर्मित, तो पाकिस्तानातून आलाय; रामदेव बाबांचा मोठा दावा, चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 13:52 IST

महाराष्ट्रात देखील हळूहळू लम्पी व्हायरस हा रोग पाय पसरू लागला आहे.

मुंबई-  देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. लम्पीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आता जनावरांनाही क्वारंटाईन (विलगीकरण) करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. जि. प.च्या प्रत्येक गटात एक क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र याचदरम्यान योगगुरु आणि पंताजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. 

लम्पी व्हायरस मानवनिर्मित असून पाकिस्तानातूनभारतात आला आहे. त्यामुळं या  व्हायरसची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लम्पी व्हायरस वेगानं पसरत आहे. यामध्ये उत्तराखंडचाही समावेश आहे. या व्हायरसच्या फैलावामुळं जनावरांचा मृत्यू होत आहे, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं.

संसर्ग कळवा, अन्यथा कारवाई

या रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :लम्पी त्वचारोगपाकिस्तानभारतमहाराष्ट्र