...तरीही आमचा संसार सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:18 IST2025-04-13T13:18:39+5:302025-04-13T13:18:39+5:30
Sachin Ahir: शिवसेनेचे (यूबीटी) आमदार सचिन अहिर आणि संगीता यांची पहिली भेट कशी झाली होती? संगीता अहिर कोणत्या क्षेत्रात काम करतात?

...तरीही आमचा संसार सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट
Sachin Ahir Love Story: शिवडी विधानसभा मतदारसंघातून मी आणि पन्हाळा मतदारसंघातून विनय कोरे १९९९ साली तरुण आमदार म्हणून निवडून आलो होतो. २००० साली संगीताशी लग्न झाले. दोघांची शाळा एकच पण, नंतर आमचे मार्ग वेगळे झाले. ती चित्रपटात काम करत होती तर मी राजकीय क्षेत्रात.
एका कार्यक्रमादरम्यान आमची भेट झाली. शाळेच्या जुन्या आठवणी निघाल्या. बोलणे वाढले, भेटी वाढल्या, आमचा प्रेमविवाह झाला. आमदाराचा प्रेमविवाह हा तेव्हा कुतूहलाचा विषय झाला होता. तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविला.
तिच्या व्यवसायात मी फारसे लक्ष घालत नाही. नफा, तोटा जे काही होईल त्याची सर्व जबाबदारी तीच घेते. प्रचंड मेहनत करून तिने सिनेमा क्षेत्रात नाव कमावले. ती भारतातील पहिली महिला चित्रपट वितरक आहे. असे म्हणतात की नेता, अभिनेता एकत्र येऊन संसार करू शकत नाही. पण, आम्ही ते करून दाखविले.
मुलगी ऐश्वर्याचा जन्म २००२ साली झाला. लंडनला शिक्षण पूर्ण करून ती इथे पॉलिटिकल सायन्समध्ये करिअर करत आहे. मुलांचे पालनपोषण, शिक्षण, अभ्यास घेणे सर्व पत्नीनेच केले. त्यांच्या शिक्षणासाठी काय हवे, काय नको ते पाहत होतो.
समाजकारण, राजकारण करताना कुटुंबाला वेळ देता आला नाही. मात्र, रात्री सर्वांसोबत घरी जेवण करणे हा नियम रोज पाळतो.
शाळेच्या आठवणींत रमतो
शालेय शिक्षकांच्या अजूनही संपर्कात आहे. शाळेसाठी खूप काही करावेसे वाटते. मध्यंतरी संगणक दिले. स्कूल कमिटीला नेहमी मदत करतो. शाळेच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करतो.
राज्यमंत्री झालो त्यावेळी शालेय मित्रांसाठी गेट टुगेदर आयोजित केले होते. प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, नरेंद्र राणे हे कॉलेजमधील मित्र आता राजकारणात आहेत. ते वगळता कॉलेजचे फार मित्र नाहीत.
शब्दांकन : महेश पवार