Join us
Daily Top 2Weekly Top 5

हां पुढला प्रश्न घ्या... राष्ट्रवादी अन् शरद पवारांसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर संजय राऊत निरुत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:10 IST

अनंत गितेंच्या विधानासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकाराने विचारला होता, त्यावर ते निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. 'हां पुढे, पुढला घ्या प्रश्न. मला माहिती नाही, मला माहितच नाही.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, या शब्दांत गीते यांनी निशाणा साधला.

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अलीकडील काळात महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद उघडपणे बोलल्याचे दिसून आले. माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केले. शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं.  

अनंत गितेंच्या विधानासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकाराने विचारला होता, त्यावर ते निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. 'हां पुढे, पुढला घ्या प्रश्न. मला माहिती नाही, मला माहितच नाही. महाराष्ट्रातील व्यवस्था ही तीन पक्षांची एकत्र असलेली व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार असतील, काँग्रेस असतील, उद्धव ठाकरे असतील, या सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार बनवलं आहे. त्यामुळे, ही व्यवस्था 5 वर्षे चालेल, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी त्या प्रश्नावर उत्तर देण्याचं स्पष्टपणे टाळलं.  

गितेंचा थेट शरद पवारांवर निशाणा

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, या शब्दांत गीते यांनी निशाणा साधला.

सरकार आघाडीचे आहे शिवसेनेचे नाही

शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे, हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी म्हणायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपले गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असे गीते म्हणाले. 

शिवसेना काँग्रेस एकविचाराची होऊ शकणार नाही

दोन्ही काँग्रेस कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मते नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअनंत गीते