पालिकेवर नजर ठेवत ‘ये है मुंबई मेरी जान’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 06:57 AM2021-03-09T06:57:20+5:302021-03-09T07:04:55+5:30

शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. वांद्रे-वरळी सागरी मार्ग शिवडी-न्हावा शेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चार पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले

‘Yeh hai mumbai meri jaan’ keeping an eye on the municipality in budget 2021 | पालिकेवर नजर ठेवत ‘ये है मुंबई मेरी जान’

पालिकेवर नजर ठेवत ‘ये है मुंबई मेरी जान’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीवर नजर ठेवत मुंबईतील पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देताना विकास प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात सोडण्यात आला आहे. त्यासाठी भरीव आर्थिक तरतुदीचे सुतोवाच दिसत नसले तरी हाती घेतलेल्या कामांच्या पूर्णत्वावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. या कामांचा कालबद्ध कार्यक्रमही यानिमित्ताने सरकारने दिला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. वांद्रे-वरळी सागरी मार्ग शिवडी-न्हावा शेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चार पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून ते तीन वर्षांत पूर्ण केले जाईल. विरार, भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या शहरांच्या विकासाकरिता तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावाशेवा मार्गाला जोडणाऱ्या ४० हजार कोटी रुपये किमतीच्या, १२६ कि.मी. लांबीच्या, विरार ते अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे.

चार जेट्टी उभारणार
मुंबई, ठाणे व नवी मुंबई या शहरांभोवती उपलब्ध असलेल्या जलमार्गाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे शासनाने ठरविले असून त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येईल. त्यासाठी कोलशेत, काल्हेर, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर या चार ठिकाणी जेट्टी उभारण्यात येत आहेत. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू असून त्यासाठी ११३३३ कोटी रुपये खर्च येणार आहे. वांद्रे-वर्सोवा-विरार या सागरी सेतू प्रकल्पाची अंदाजित किंमत ४२ हजार कोटी रुपये असून कामाचा पूर्व सुसाध्यता अहवाल तयार करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

प्रकल्पांचा मार्ग मोकळा
पायाभूत व विकास प्रकल्प सुरू असताना ते पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना महापालिकेला करावा लागतो. अनेकवेळा सरकारी लालफितीत अडकून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडतात. मात्र राज्य सरकारने मुंबईतील काही प्रकल्पांना अर्थसंकल्पात स्थान दिले आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या मार्गातील अडसर दूर झाला आहे.

- इकबालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

महिलांचा 
असाही गौरव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या गौरवार्थ सभागृहात खालील काव्यपंक्ती सादर केल्या.
शुभ शकुनांचं तोरण तू 
मांगल्याचं औक्षण तू झिजतानाही दरवळणारे देव्हाऱ्यातील चंदन तू... 
स्त्री नसते केवळ वस्तू 
ती नसते केवळ जननी
ती असते नवनिर्मितीची गाथा
जिथे सर्वांनी टेकवावा माथा...

ठाणे खाडीला समांतर सुमारे १५ किलोमीटर लांबीचा व ४० मीटर रुंदीचा ठाणे कोस्टल रोड उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे १२५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंब्रा बायपास जंक्शन, शिळ कल्याण फाटा, शिळफाटा व कल्याणफाटा जंक्शनवर उड्डाणपुलांची निर्मिती, महामागार्चे रुंदीकरण तसेच कल्याणफाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे.

मुंबईतील १४ मेट्रो लाइन्सचे ३३७ किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर असून त्याकरिता १ लाख ४०८१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सर्व १४ मेट्रो मार्गिकांची कामे पूर्णत्वाच्या विविध टप्प्यावर आहेत. मेट्रो मार्ग २ अ, मेट्रो मार्ग ७ या मार्गांवरील कामे चालू वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची अंदाजित किंमत ६६०० कोटी रुपये असून कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून हा मार्ग 
२०२४
पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या या प्रकल्पाच्या दक्षिण मुंबईतील बोगद्याचे काम सुरू आहे. मुंबई शहरातील रेल्वे रुळावरील ७ उड्डाणपुलांची कामेही हाती घेण्यात येत आहेत.
 

Web Title: ‘Yeh hai mumbai meri jaan’ keeping an eye on the municipality in budget 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.