यंदाचा ऑक्टोबर मान्सूनमुळे ठरला ‘हिट’, मुंबईसह महाराष्ट्रात जादा पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:31 IST2020-10-31T05:55:52+5:302020-10-31T07:31:16+5:30

Mumbai Rain : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशांचा पारा ओलांडते. मात्र या वर्षी कमाल तापमान ३५ च्याही पुढे गेलेले नाही. एकंदर महाराष्ट्रात ७१ टक्के जादा तर मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे २३३, १०१ टक्के जादा पावसाची नोंद झाली.

This year's October monsoon was a 'hit', with heavy rainfall recorded in Mumbai and Maharashtra | यंदाचा ऑक्टोबर मान्सूनमुळे ठरला ‘हिट’, मुंबईसह महाराष्ट्रात जादा पावसाची नोंद

यंदाचा ऑक्टोबर मान्सूनमुळे ठरला ‘हिट’, मुंबईसह महाराष्ट्रात जादा पावसाची नोंद

मुंबई : एव्हाना नागरिकांना ऑक्टोबर हीटमुळे घाम फुटलेला असतो. मात्र यंदाचे वर्ष त्यास अपवाद ठरले. कारण या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबल्याने मुंबईसह महाराष्ट्रात जादा पावसाची नोंद झाली. विशेषत: दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशांचा पारा ओलांडते. मात्र या वर्षी कमाल तापमान ३५ च्याही पुढे गेलेले नाही. एकंदर महाराष्ट्रात ७१ टक्के जादा तर मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे २३३, १०१ टक्के जादा पावसाची नोंद झाली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात ६९.८ मिलिमीटर पावसाची नोंद होते. या वर्षी ही नोंद ११९.७ मिलिमीटर एवढी आहे. या महिन्यात ७१ टक्के अधिकचा पाऊस पडला. यंदा ऑक्टोबर हीटचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. मुंबई शहरात २१६ मिमी. पाऊस झाला असून, तो २३३ टक्के जास्त आहे. तर उपनगरात  १४१.२ मिमी. पाऊस झाला असून, तो १०१ टक्के जास्त आहे.

कोकणसह गोव्यात २४१.६, मध्य महाराष्ट्रात १५५.६, मराठवाड्यात १०६.५ तर विदर्भात ४७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, वाशिम, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली. पालघर, धुळे, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा आणि गोंदियात बऱ्यापैकी पाऊस झाला, तर नंदुरबार, बुलडाणा, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची तूट आहे.

Web Title: This year's October monsoon was a 'hit', with heavy rainfall recorded in Mumbai and Maharashtra