यंदा अभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी होणार स्वतंत्र प्रवेश परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 12:17 AM2019-12-05T00:17:26+5:302019-12-05T00:18:40+5:30

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांतील प्रवेशासाठी बारावीनंतर एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते.

This year there will be a separate admission test for engineering, medical | यंदा अभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी होणार स्वतंत्र प्रवेश परीक्षा

यंदा अभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी होणार स्वतंत्र प्रवेश परीक्षा

googlenewsNext

मुंबई : अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे की वैद्यकीय क्षेत्रात? या गोंधळात असलेले विद्यार्थी यापूर्वी या दोन्हीच्या प्रवेश परीक्षा देत होते आणि त्यासाठी सीईटीच्या पीसीएमबी पर्यायाचा अवलंब करीत होते. मात्र एप्रिल २०१९ मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटीत विद्यार्थ्यांना पीसीएमबी हा पर्याय नसेल; त्याऐवजी पीसीबी, पीसीएमसाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागेल. यावर बुधवारी सीईटी सेलने शिक्कामोर्तब केले. हा निर्णय एआरएच्या बैठकीत अंतिम झाल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांतील प्रवेशासाठी बारावीनंतर एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. याच परीक्षेच्या आधारावर इंजिनीअरिंग व औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात. मागील वर्षापर्यंत या परीक्षेच्या निकालासाठी पर्सेन्टाइल पद्धतीचा अवलंब केला जात होता. मात्र, निकालावेळी अनेक तक्रारी आल्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा अभियांत्रिकी व वैद्यकीय दोन्ही क्षेत्रांसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना पीसीएमबी ही परीक्षा देण्याऐवजी त्यांनी या दोन्हीच्या म्हणजे पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) व पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) स्वतंत्र परीक्षा द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन्ही गटांचा निकाल, गुणपत्रिका स्वतंत्र असतील. एमएचटी सीईटी देताना आठ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. १३ ते १७ एप्रिल या कालावधीत आणि २० ते २३ एप्रिल या कालावधीत गटानुसार परीक्षा होणार आहेत. पीसीबी आणि पीसीएम यापैकी कोणत्या गटाच्या परीक्षा आधी होतील, यासंदर्भातील निर्णय विद्यार्थी संख्येनुसार नंतर घेण्यात येणार असल्याचेही सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शुल्कात सवलत नाही
विद्यार्थी पीसीएम व पीसीबी अशा दोन्ही परीक्षा देऊ शकतात. मात्र, गेल्या वर्षीपर्यंत दोन्ही परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यात येत होती. यंदा मात्र, दोन्ही परीक्षा दिल्या, तरी अशा प्रकारची कोणतीच सवलत शुल्कात देण्यात येणार नाही. दोन्ही परीक्षा स्वतंत्र होणार असल्याने त्याचे शुल्क आणि अर्जही विद्यार्थ्यांना स्वतंत्र, वेगवेगळ्या पद्धतीने भरावे लागेल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले.

Web Title: This year there will be a separate admission test for engineering, medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.