Join us

यंदा गणेशोत्सव साधेपणाने; विलेपार्ले अंधेरीतील १५० गणेशोत्सव मंडळांचा  निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 18:40 IST

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याकडे अनेक गणेशोत्सव मंडळांचा कल  आहे.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : यंदा कोरोनाच्या महामारीचे असलेले संकट लक्षात घेता यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय नुकताच दहीहंडी उत्सव समितीने घेतला आहे. तर आता यंदाचा गणेशोत्सव देखिल साधेपणाने साजरा करण्याचा अनेक गणेशोत्सव मंडळांचा कल  आहे. कोरोनाच्या महामारीचे संकट लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जपत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.तर अनेक मंडळांनी रक्तदान शिबीर, सॅनिटायझर,मास्क वाटप,जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आदी उपक्रम राबवले आहेत.

येत्या दि,22 ऑगस्ट पासून साजरा होणारा  गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय  पश्चिम उपनगरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.त्यामुळे यंदा मोठ्या उंचीच्या गणेश मूर्त्या व दरवर्षी असणारा गणेशोत्सवातील जल्लोष व भाविकांची मध्यरात्री गणेशोत्सवातील आकर्षक देखावे बघण्यासाठी होणारी गर्दी आदींचे चित्र यंदा दिसणार नाही. अंधेरी विलेपार्ले पट्यातील सुमारे १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. 

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा साधेपणाने आणि कमी उंचीची गणेश मूर्ती स्थापन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अंधेरी विलेपार्ले येथील जवळपास सर्व मंडळांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली साजरा होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.गणेशोत्सव मंडळाचे सक्रीय पदाधिकारी नितीन डिचोलकर यांनी लोकमतला ही माहिती दिली.त्यांनी येथील सर्व गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून त्यांना एकत्र आणले.

राज्याचे परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांच्या सूचनेनूसार विलेपार्ल्यातील सर्व मंडळांची विशेष बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला असून यावेळी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी सार्वजनिक मंडळांनी ३ ते ४ फूटांच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी, गणपतीची वर्गणी घेण्यात येऊ नये,गणेश मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सोहळा रद्द करण्या बरोबर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करवा असे अनेक निर्णय यावेळी घेण्यात आले. बाबा कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले. 

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईलॉकडाऊन अनलॉकमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस