वरळीत हिट ॲण्ड रन; महिलेला कारने दोन किमी नेले फरफटत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 05:32 AM2024-07-08T05:32:51+5:302024-07-08T05:33:07+5:30

बीएमडब्ल्यूच्या धडकेत महिलेचा मृत्यू, आरोपी फरार; चालकाच्या वडिलांसह एकाला अटक

Worli hit and run case Woman dies in collision with BMW accused absconding | वरळीत हिट ॲण्ड रन; महिलेला कारने दोन किमी नेले फरफटत

वरळीत हिट ॲण्ड रन; महिलेला कारने दोन किमी नेले फरफटत

मुंबई :  बीएमडब्ल्यू कार चालकाने रविवारी पहाटे दुचाकीला धडक देत एका मासळी विक्रेत्या महिलेला २ किमी फरफटत नेले. त्यात तिचा मृत्यू झाला. मिहीर शहा असे कारचालकाचे नाव असून त्याने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. 

मिहीरने शनिवारी रात्री जुहूतील एका बारमध्ये मद्यप्राशन केल्याचे समजते. चालकावर कठोर कारवाईची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे.   
कावेरी नाखवा (४५), असे मृत  महिलेचे नाव आहे. अपघाताचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले. वरळी पोलिसांनी मिहीरविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, राजेश शहा आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली आहे. मिहीरचा शोध सुरू आहे. मिहीरचे वडील राजेश शहा हे बांधकामासाठी लागणारा कच्चा माल पुरवतात. ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. 

वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या नाखवा दाम्पत्याचा मासेविक्रीचा व्यवसाय आहे. कावेरी वरळी कोळीवाड्यातील मासळी बाजारात मासेविक्री करीत असत. नाखवा दाम्पत्य रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केट येथे होलसेल मार्केटमध्ये मासे खरेदीसाठी गेले होते. 

दोघेही वरळीकडे येत असताना ॲनी बेझंट रोडवरील लँडमार्क जीप शोरूमसमोर सकाळी ५:३० वाजता त्यांच्या दुचाकीला आरोपी मिहीर शहाच्या कारने धडक दिली.
 
अपघातानंतर प्रदीप नाखवा कारच्या बोनेटला धडकून डाव्या बाजूला पडले, तर कावेरी नाखवा कारच्या बोनेटसमोर आल्या. कार चालक मिहीर शहा याने कावेरी यांना तसेच पुढे दाेन किलाेमीटरपर्यंत फरफटत नेले.

वरळी सीफेस येथील सी लिंकपर्यंत फरफटत नेले

 मिहीर शहाने कार थांबवून जखमी नाखवा कुटुंबाला मदत करण्याऐवजी कारचा वेग वाढवला आणि कावेरी यांना त्याच अवस्थेत दोन किलोमीटर वरळी सीफेस येथील सीलिंकपर्यंत फरफटत नेले. 

 नंतर कार थांबवून गंभीर जखमी अवस्थेतील कावेरी यांना रस्त्यातच सोडून आरोपी मिहीर शहा वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून पसार झाला. आरोपीने वांद्रे कलानगर परिसरात कार आणि चालक राजऋषी बिडावत याला सोडले आणि तेथून फरार झाला.  

 गंभीर अवस्थेत निपचित पडलेल्या कावेरी यांना पोलिसांनी नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले.   

आरोपी दारूच्या नशेत? 

दहावीपर्यंत शिकलेला २४ वर्षीय मिहीरही व्यावसायिक आहे. तो दारूच्या नशेत असताना हा अपघात घडल्याचा संशय आहे. तो रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह दारू पार्टीसाठी गेला होता. बारमधून निघाल्यावर तो गोरेगावला गेला. मिहीर फरार झाल्यामुळे तो दारूच्या नशेत होता की नाही, याबाबत निश्चित काही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

राजेश शहा यांना अटक

मिहीर शहा यास पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मिहीरचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली असल्याच्या वृत्ताला पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दुजोरा दिला आहे.

कोठून कोठे प्रवास केला?

आरोपी मिहीर शहा याने घरी जाऊन आपल्या चालकाला लाँग ड्राईव्हला चालण्याचे सांगितले. तो मुंबईत आला आणि पुन्हा गोरेगावला जात होता. यावेळी तो स्वतः गाडी चालवत होता. त्याने रात्री कोठून कोठे प्रवास केला, त्याची माहिती पोलिस घेत आहेत.

काेणत्या कलमान्वये झाला गुन्हा दाखल? 
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी कलम १०५, २८१, १२५ (ब), २३८, ३२४ (४) भारतीय न्याय संहितासह कलम - १८४, १३४(अ), १३४ (ब), १८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही

कायद्यासमोर सर्व समान आहेत. सरकार सगळ्या घटनांकडे समान पाहते. त्यामुळे वरळीतील ‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी वेगळा न्याय दिला जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या घटना वारंवार होऊ नयेत, यासाठी शासन आणि गृह विभाग उपाययोजना करेल. विरोधी पक्षांना टीका करण्यापलीकडे काही काम नाही. तो पक्षाचा कार्यकर्ता असला, तरी त्याला कोणी पाठीशी घालणार नाही - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

वरळीतील ‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई पोलिस खात्याला दिले आहेत - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

राजकीय हस्तक्षेप न करता आरोपीवर कारवाई व्हावी. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. चालकाला लवकरात लवकर अटक होऊन कडक शिक्षा व्हावी- आदित्य ठाकरे, आमदार, उद्धवसेना

सत्तेतील लोकांना आणि त्यांच्या बगलबच्चांना सरकार पाठिंबा देत आहे. सामान्यांना चिरडण्याचा अधिकारच त्यांना सरकारने दिला. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Worli hit and run case Woman dies in collision with BMW accused absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.