गोळीबाराचा आवाज अन् वरळी पोलिसांना गेला फोन; फ्लॅटमध्ये सापडला पती-पत्नीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:49 IST2025-06-09T09:49:18+5:302025-06-09T09:49:35+5:30

वरळीत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Worli Crime After a fightthe husband shot his wife then killed himself | गोळीबाराचा आवाज अन् वरळी पोलिसांना गेला फोन; फ्लॅटमध्ये सापडला पती-पत्नीचा मृतदेह

गोळीबाराचा आवाज अन् वरळी पोलिसांना गेला फोन; फ्लॅटमध्ये सापडला पती-पत्नीचा मृतदेह

Worli Crime: वरळीत पुन्हा एकदा हादरवणारे हत्याकांड समोर आलं आहे. रविवारी वरळीत कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. ६० वर्षीय पतीने ५३ वर्षीय पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर बंदुकीतून गोळी झाडून स्वतःला संपवले. दुहेरी हत्याकांडाचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वरळीतील सिद्धार्थ नगरमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरु केला.

रविवारी सकाळी वरळी परिसरात एका ६० वर्षीय वृद्धाने आपल्या पत्नीवर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिद्धार्थ नगरमधील एका निवासी इमारतीत सकाळी ६ वाजता घडली. राजमनोहर नामपल्ली (६०) आणि लता नामपल्ली (५२) अशी मृतांची नावे आहेत. नामपल्लीने आधी त्याची पत्नी लता हिच्यावर गोळी झाडली आणि नंतर त्याच देशी बनावटीच्या पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी या जोडप्याचा ३० वर्षीय मुलगा आणि त्याची पत्नी देखील घरातच होते आणि दोघेही बेडरूममध्ये झोपले होते. तर नामपल्ली दाम्पत्य हॉलमध्ये होते. रविवारी सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास एका दूधवाल्याने, वृत्तपत्र विक्रेत्या आणि इमारतीच्या रक्षकाने वरळी पोलिसांना गोळीबाराचा आवाज ऐकल्याची माहिती फोन करून दिली. पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता त्यांना एका घरात वृद्ध जोडप्याचे मृतदेह आढळले.

नामपल्ली त्याची पत्नी, मुलगा आणि सुनेसह एकाच फ्लॅटमध्ये राहत होता. गेल्या काही काळापासून वडील आणि मुलामध्ये वेगळे राहण्यावरून भांडणे सुरू होती. नामपल्ली आणि त्याचा मुलगा यांच्यात मद्यपानावरुन अनेकदा वाद होत असत. त्यावेळी लता त्यांच्या मुलाची बाजू घेत असे. शनिवारी संध्याकाळीही दोघांमध्ये असेच भांडण झाले आणि नामपल्ली खूप नाराज होते. त्यातूनच सकाळच्या सुमारास नामपल्ली यांनी हा सगळा प्रकार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ५:३० ते ६:३० च्या दरम्यान, राजमनोहर नामपल्ली यांनी त्यांची पत्नी लता झोपेत असताना त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्यांनी घराच्या कॉरिडॉरमध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडली. यासाठी राजमनोहर यांनी देशी बनावटीच्या पिस्तूलचा वापर केला. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title: Worli Crime After a fightthe husband shot his wife then killed himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.