Work on slabs of six subway stations on Metro-3 line is completed | मेट्रो-३ मार्गिकेवर सहा भुयारी मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण

मेट्रो-३ मार्गिकेवर सहा भुयारी मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला आता वेग आला आहे. या संपूर्ण मार्गिकेवरील स्थानकांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून  या मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांपैकी सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळनाका आणि एमआयडीसी अशा सहा मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने (एमएमआरसी) सांगण्यात आले
आहे.
या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामापैकी आत्तापर्यंत ८७ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम झाले आहे. २६ मेट्रो स्थानकांपैकी १३ स्थानकांचे भुयारीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित १३ मेट्रो स्थानकांचे भुयारीकरण येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. सहा मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण झाल्याने इतर कामांनाही आता गती येणार आहे.
मेट्रो मार्गिकेसाठी ५५ कि.मी.चे भुयारीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेने सहा व्यावसायिक केंद्रे, पाच उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोकलने न जोडलेले परिसर जोडले जाणार आहेत. स्लॅबच्या कामासह मेट्रो-३ मार्गिकेचे संचलन आणि देखभाल कामाच्या निविदा फेब्रुवारीमध्ये मागविण्यात येतील, तर जायकाच्या कर्जाचा
तिसरा टप्पा मार्चपर्यंत येणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, या वर्षी मार्गासाठी रूळ टाकण्याचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. यासह विविध प्रणालींच्या कामात आरेखन काम पूर्ण होऊन उप कंत्राटदारांची नियुक्ती करणार आहे़

मेट्रो-४ मार्गिकेवर पहिल्यांदाच यू-गर्डरचे काम यशस्वीरीत्या पूर्ण

मुंबई : वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड- कासारवडावली या मेट्रो-४ मार्गिकेवरील घोडबंदर येथील आर सिटी मॉलजवळ यू गर्डरचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. या मार्गिकेचे काम रिलायन्स इन्फ्रा आणि अस्ताल्दी या संयुक्त कंपनीमार्फत सुरू आहे.
वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड-कासारवडवली अशी ही मेट्रो-४ मार्गिका संपूर्णत: उन्नत मार्गे बांधण्यात येणार आहे. ३२.३२ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर एकूण ३२ स्थानके बांधण्यात येणार आहेत. दरदिवशी वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मार्गावर २०२१ पर्यंत ८ लाख ७० हजार प्रवासी तर २०३१ पर्यंत १२ लाख १० हजार प्रवासी प्रवास करतील. या मार्गिकेच्या विकासकामांसाठीच्या खरेदी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो-४ मार्गिकांशी संबंधित कामे वेगाने सुरू आहेत. रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, ट्रेन कंट्रोल आदीबाबतच्या कामांचे करार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २० डिसेंबर, २०१९ रोजी रोलिंग स्टॉकची निविदा काढण्यात आली आहे.

Web Title: Work on slabs of six subway stations on Metro-3 line is completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.