आजी-माजी मंत्री, अधिकाऱ्यांची नावे सांगून १५० कोटींची वर्क ऑर्डर; ६ कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:09 IST2025-07-31T10:08:20+5:302025-07-31T10:09:11+5:30

हे आरोपी नेमके कोण आहे? याचा पोलिस तपास करत आहेत.

work order worth 150 crores by naming current and former ministers and officials embezzlement of 6 crores | आजी-माजी मंत्री, अधिकाऱ्यांची नावे सांगून १५० कोटींची वर्क ऑर्डर; ६ कोटींचा चुना

आजी-माजी मंत्री, अधिकाऱ्यांची नावे सांगून १५० कोटींची वर्क ऑर्डर; ६ कोटींचा चुना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत एका व्यावसायिकाची तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना वांद्रेत उघडकीस आली आहे. यावेळी आरोपींनी स्वत:ला माजी मंत्री, आरोग्य व अन्न-औषध विभागाचे ओएसडी आणि आयएएस अधिकारी असल्याचे भासवत महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र, वाहनावर शासनाचा बोर्ड, तसेच दीडशे कोटींचा बनावट ‘जीआर’च्या आधारे व्यावसायिकाला जाळ्यात ओढले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, कौस्तुभ भामरे आणि उद्धव भामरे यांच्याविरोधात गुन्हा नोदवला.

तक्रारदार तुफैल इद्रिस खान यांच्याकडे नितीन गुप्ता २०१२ पासून सल्लागार म्हणून कार्यरत होता. २० मार्च रोजी वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक ठरवण्यात आली. यामध्ये बनसोडेने स्वत:ला माजी मंत्री, पवारने ओएसडी, तर कौस्तुभ भामरे यांनी आयएएस अधिकारी  असल्याचे सांगितले. त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र शासनाची बनावट ओळखपत्रे होती व गाडीवरही महाराष्ट्र शासनाचा बोर्ड होता. 

गुप्ताने तक्रारदाराच्या कंपनीला १५० कोटींची आयसीयू बेड तयार करण्याची ऑर्डर मिळेल असे सांगितले. विश्वास बसवण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचा देखावा करण्यात आला. ऑर्डर मिळाल्यानंतर ३५% ॲडव्हान्स मिळेल आणि त्यातील ३३% मंत्र्यांना द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने नातेवाईक आणि मित्रांकडून कर्ज घेऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांना कमिशन म्हणून ६ कोटी दिले.

कारवरही महाराष्ट्र शासन!

अनेकजण तक्रारदार यांच्याकडे पैसे गुंतविण्यासाठी घाबरत असल्याने आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पैसे परत मिळतील, असा विश्वास दाखवला. आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांच्या नावाने कोटेशनच्या तीन प्रती हार्ड कॉपीमध्ये त्यांना देण्यात आले. पैसे घेताना वापरण्यात आलेल्या कारवरही महाराष्ट्र शासन असा बोर्ड होता.  मात्र, ठरल्याप्रमाणे ऑर्डर निघाली नाही. त्यांनी ‘जीआर’ची पडताळणी करताच तो देखील बनावट असल्याचे स्पष्ट होताच त्यांना धक्का बसला. 

कारखाने बंदची भीती

पैसे परत करण्यासाठी तगादा लावताच आरोपींनी पैसे देण्यास नकार देत कारखाने बंद पाडण्याची भीती घातली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मंगळवारी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, हे आरोपी नेमके कोण आहे? याचा पोलिस तपास करत आहेत.

 

Web Title: work order worth 150 crores by naming current and former ministers and officials embezzlement of 6 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.