Join us  

Raj Thackeray: भाजपाच्या, मोदींच्या विरोधात काम करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:22 PM

मोदीमुक्त भारत होण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हे मी आधीपण बोललो होतो. यापुढे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात देश अशी आगामी लोकसभा निवडणूक असेल.

ठळक मुद्देएवढा खोटा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही; राज ठाकरे यांचे मोदीवर शरसंधानभाजपाच्या, मोदींच्या विरोधात काम करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) अद्याप कोणती भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कामाला लागा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे भाजपाविरोधात प्रचार करताना दिसणार आहेत.

मोदीमुक्त भारत होण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हे मी आधीपण बोललो होतो. यापुढे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात देश अशी आगामी लोकसभा निवडणूक असेल. तसेच, यापुढे मी ज्या सभा घेईन, त्या मोदी-शहा यांच्या विरोधातल्याच सभा असतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले. याचबरोबर, भाजपाचे लोक तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर ते घ्या. त्यांनी देशाला गेली पाच वर्षे लुटले आहे. त्यामुळे तुम्ही तुम्ही त्यांना लुटले तर काही हरकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. 

भाजपाकडून चौकीदारचे कॅम्पेन सुरु आहे, निवडणूक भारताची आहे की नेपाळची? असा सवाल करत राज ठाकरे यांनी भाजपाकडून गेल्या दोन दिवसांपासून सुर झालेल्या मै भी चौकीदार हूं, या कॅम्पेची शेलक्या शब्दात खिल्ली उडवली.  भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जात आहे, खोट्या फोटोंच्या आधारे खोटा प्रचार भाजपाकडून करण्यात येत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

देश आज धोक्यात आहे. मोदी आणि शहा राजकीय पटलावरून दूर झालेच पाहिजेत. भाजपविरोधातच भूमिका घ्या, असे आवाहान राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. हा कुठल्या पक्षाच्या विरोधाचा भाग नाही. तर मोदी आणि शहा ही दोन माणसं बाजूला झाली की मग पक्षांची लढाई, असेल असेही राज ठाकरे म्हणाले. मोदींसारखा खोटा पंतप्रधान मी आजवर पाहिलेला नाही. मोदींकडून गुजरातची खोटी टिमकी वाजवण्यात आली. मात्र, सर्व क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.  

नरेंद्र मोदींना आपण मागे काय बोललोय, पुढे काय बोलतोय याचेही भान राहिलेले नाही. शरद पवारांविरोधात बोलले होते. नंतर बारामतीत जाऊन त्याचे गुणगाण गायले. गटारात पाइप घाला, त्यातून जो गॅस येईल त्याच्यावर चहा बनवा. पंडित नेहरुंना शिव्या, इंदिरा गांधींना शिव्या घालतात. वल्लभभाई पटेलांचा पुतळा जिथे उभा केला, त्या सरदार सरोवराचं भूमिपूजन पंडित नेहरुंनी केलंय. प्रधान सेवक हा शब्द कुणाचा आहे? हा शब्द मुळात पंडित नेहरुंचा आहे. स्मृतिभवन आहे, त्यात फोटो आहे. त्यावर लिहिलय 'प्रथम सेवक समजावं'. आता काय वेळ आली, आम्ही तुम्हाला शिव्या द्यायची वेळ आली आहे. एवढा खोटा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

दरम्यान, भाषणाच्या सुरवारातीला राज ठाकरे यांनी सांगितले की, माझ्यासाठी विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे आधीच सांगितले होते. मागील काही दिवसांपासून मनसेला आघाडीत घेणार की नाही, किती जागा लढवणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, या चर्चांना राज ठाकरे  यांनी आज उत्तर दिले.  ते म्हणाले, 'गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही, पण तरीही मनसे एक सीट दोन सीट लढवणार असे तर्क लढवायला माध्यमांनीच सुरुवात केली. पण माझा पाडवा मेळावा आठवा, मी म्हणालो होतो देशातील सर्व पक्षांनी मोदी आणि शाह ह्यांच्या विरोधात एकत्र यायला हवे'. यापुढे राज ठाकरे म्हणाले, 'मी अजित पवारांना आणि अशोक चव्हाणांना फोनवर बोललो की मी तुम्हाला कधी सीट्स मागितल्या, कधी युतीची चर्चा केली? यावर ते म्हणाले नाही, मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात?'

टॅग्स :राज ठाकरेमनसेलोकसभा