Women;s Day Special: गावाकडची 'बिझनेसवूमन', लघु-उद्योगातून 27 महिलांना दिला रोजगार

By महेश गलांडे | Published: March 8, 2020 10:49 AM2020-03-08T10:49:53+5:302020-03-08T11:43:37+5:30

5 रुपयाच्या प्रश्नानं सतावलं, पतीच्या निधनानंतर तिनं जिद्दीनं स्वत:ला उभारलं

Women;s Day Special: Village 'businesswoman' works to save 27 women from savings group | Women;s Day Special: गावाकडची 'बिझनेसवूमन', लघु-उद्योगातून 27 महिलांना दिला रोजगार

Women;s Day Special: गावाकडची 'बिझनेसवूमन', लघु-उद्योगातून 27 महिलांना दिला रोजगार

googlenewsNext

मयूर गलांडे

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे, साधारणं 7 हजार लोकवस्तीचं गाव. या गावातील स्वातीनं पतीच्या निधनानंतर आपल्या जिद्दीनं अन् कष्टानं उद्योजक बवनून दाखवलं. छोटं असेल पण स्वत:च विश्व शुन्यातून निर्माण केलंय. त्यामुळेच, धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंनी ज्या मंचावर आपला जीवनप्रवास उलघडला, त्याच मंचावर गावाकडच्या या महिलेला उद्योजक, बिझनेसवूमन म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. 

स्वाती हर्षद ठोगें यांचे बालपणापासूनच घरी खूप लाड व्हायचे. पण, मुलींना कॉलेजला पाठवायचं नाही, यावर कुटुंबीय ठाम. म्हणून, दहावीनंतर शिक्षण बंद झालं अन लवकरच लग्नगाठ बांधण्यात आली. लग्नानंतर तीन वर्षांचा सुखी संसार सुरू असतानाच 2010 मध्ये पतीचं निधन झालं. तेव्हा स्वाती यांची मुलगी साडेतीन महिन्यांची तर मुलगा पावणेदोन वर्षांचा होता. आता पुढं कसं? हा डोंगराएवढा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. कारण, सासरच्यांनी हात पाठिमागे घेत, तुझी मुलगी आणि तूझं तू बघं असं सांगितंलेलं. त्यावेळी, मावस बहिणीनं बचत गटात जाण्याचं सूचवलं. पण, बचत गटात जायचं असेल तर तू घरातून वेगळं राहा, असा दमच सासरच्या मंडळींनी दिला. कारण, आपल्यात कुणीही बचत गटात जात नाही, असं त्यांचं सांगणं होतं. अखेर, दिवस-रात्र विचार करून, स्वातीच ठरलं. आपल्या दोन्ही चिमुकल्यांच भविष्य आणि स्वतःच्या पायावर उभ राहायची जिद्द, यामुळे सासरच्यांना दूर करत स्वातीनं बचत गटाला जवळ केलं.

एका प्रसंगानं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याचं स्वाती सांगतात. स्वाती यांच्या मुलाने दीराकडून म्हणजेच त्याच्या काकाकडून 5 रुपये घेतले होते. मात्र, तेच 5 रुपये काकाने 10 वेळा त्या चिमुकल्याकडे परत मागितले. तुझ्या आईकडून माझे पैसे घेऊन दे, असे ते म्हणायचे. जर, 5 रुपयांचा हा विषय असेल तर पुढचं आयुष्य काय? हा विचार सातत्याने डोक्यात घोंगावत होता. त्याचवेळी, बचत गटात जायचाच, हा निश्चय त्यांनी केला. 

स्वाती यांनी गावातील बचत गटात सहभागी होऊन सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात पहिल्यांदाच चहाचा स्टॉल लावला. त्यासाठीही बचत गटाच्या मॅडमकडून 2 हजार रुपये उसने घेतले होते. या प्रदर्शनात 5 दिवसांत 2 हजाराचे 7 हजार झाले. त्यानंतर, मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ एका प्रदर्शनात स्टॉल लावायचा होता. मात्र, पुन्हा पैशांचा प्रश्न आलाच. त्यावेळी, गावात महिलांनी बनवलेला माल उधारीवर घेतला. गावातील महिलांचा 60 हजार रुपयांचा तो माल 1 लाख 20 हजारांना विकला. यामधून स्वाती यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होत गेला. मात्र, त्यांना स्वत:चं काहीतरी करायंच होतं. त्यासाठी त्यांनी बचत गटातील मॅडमकडे विचारणा केली. त्यानंतर, अखेर ठरलं.

उडीद पापड आणि शाबू पापडचा बिझनेस करायचा असं त्यांनी ठरवलं. बचत गटातील दोन महिलांना सोबत घेऊन स्वातीने पापडाचा छोटासा उद्योग सुरू केला. दरम्यान, केरळमध्ये 10 राज्यांतील बचत गटांचा स्टॉल लावण्यात येणार होता. त्यासाठी बार्शी तालुक्यातून जाणाऱ्या 5 महिलांच्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी स्वाती यांना मिळाली. बार्शी आणि उपळाई न सोडलेल्या स्वाती बचत गटामुळे पहिल्यांदा केरळला गेल्या. या बचत गटात त्यांनी पुरणपोळीचा स्टॉल मांडला, पण केरळवासियांनी ढुंकूणही पाहिलं नाही. 

त्यामुळे, प्रदर्शनात नेमकं काय चालतं हे पाहिल्यानंतर चिकन-मटन हे त्यांच्या लक्षात आलं. मग, आपल्या सहकारी महिलांना घेऊन त्यांनी तिथंच सोलापूरी अन् कोल्हापूरी चिकन व अंडाकरीचा स्टॉल सुरू केला. त्यातून त्यांच्या गटाने 1.60 लाख रुपये कमाई केली. 
आता, स्वाती यांनी 1 वर्षांपूर्वी  स्वदेशी मार्केटींग नावाची कंपनी सुरू केली. त्यासाठी एसव्हीपीच्या रेश्मा राऊत, किरण माने आणि शिवाजी पवार यांच मोठं सहकार्य त्यांना लाभल. तर, उमेदच्या दिवंगत शुभांगी बोण्डवे यांनीही कायम पाठबळ दिलं. ही कंपनी तालुक्याच्या बचत गटांतील महिलांचे उत्पादन विकत घेते. ते उत्पादन बार्शी, सोलापूर, पुणे, मुंबई याठिकाणी विकले जातात. आज 27 महिला या कंपनीसाठी काम करतात, कंपनीच्या माध्यमातून त्यांना महिन्याला जवळपास 25 ते 30 हजार रुपये मिळतात, तेही घरी बसून. तालुक्यातील बचतगटाच्या महिलांचे 200 प्रकारचे प्रोडक्ट स्वदेशी मार्केटिंग कंपनीद्वारे बाजारात विकले जातात. त्यात, शेंगा चटणी, कडक भाकरी, काळं तिखट, लाल तिखट, गरम मसाला याला मोठी मागणीय

स्वत: बिझनेस करा, स्वत: मालक व्हा, स्वत: नोकर व्हा अन् स्वत:च कामगारही व्हा. नुकसानीची भिती न बाळगता, व्यवसाय करत राहा, वेळ लागेल पण एक दिवस तुमचा असेल, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असा बिझनेसमंत्रच गावच्या स्वातीताईंनी दिलाय. आपल्याला काय आवडतं, यापेक्षा मार्केटमध्ये काय चालतं हे महत्वाचं असल्याची बिझनेस थेरीसुद्धा स्वाती यांनी सहजच सांगितली. 5 रुपयांचा प्रश्न सतावणारी अन् 2 हजार मागणारी स्वाती आज महिन्याला 50 हजार रुपये कमावतेय, तर 27 महिलांना रोजगारही देतेय, हेही नसे थोडके.....!

गावच्या मातीतील जिद्दी असलेल्या बिझनेसवूमन स्वातीची यशोगाथा उद्योजक बनू पाहणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी आहे, विशेषतः महिलांना...

Web Title: Women;s Day Special: Village 'businesswoman' works to save 27 women from savings group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.