रोशनी शिंदे कारवाईप्रकरणी महिला आयोग असमाधानी, पोलीस आयुक्तांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 20:43 IST2023-04-06T20:41:30+5:302023-04-06T20:43:16+5:30
रोशनी यांना सोमवारी मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी रात्री १० वाजता गुन्हा नोंदविण्यासाठी कासारवडवली पोलिसांत तक्रार केली.

रोशनी शिंदे कारवाईप्रकरणी महिला आयोग असमाधानी, पोलीस आयुक्तांना निर्देश
मुंबई - शिवसेना युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला आणि मारहाणप्रकरणी अखेर कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी दुपारी अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल झाला आहे. न्यायालयाच्या परवानगीने पोलिस याप्रकरणी तपास करणार असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी दिली. याप्रकरणी, राज्य महिला आयोगानेही पोलिसांकडे अहवाल मागवला होता. मात्र, पोलिसांकडून मिळालेल्या अहवालावर असमाधानी असल्याचं महिला आयोगाने म्हटलं आहे. तसेच, ठाणे पोलिस आयुक्तांना निर्देशही देण्यात आले आहेत.
रोशनी यांना सोमवारी मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी रात्री १० वाजता गुन्हा नोंदविण्यासाठी कासारवडवली पोलिसांत तक्रार केली. दुसरा दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मोर्चाची हाक दिली. मोर्च्यापूर्वीच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर, राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली होती. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्त, ठाणे यांना रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, त्याप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याकडून आज अहवाल सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्त,ठाणे यांना श्रीमती रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, त्याप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याकडून आज अहवाल सादर करण्यात आला आहे.1/2@maharashtra_hmo@Maha_MahilaAyog@DGPMaharashtra@ThaneCityPolicepic.twitter.com/Fd34Nfqnd8
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 6, 2023
याप्रकरणी पोलीसांनी केलेल्या कारवाईत त्रुटी असल्याचे सदर अहवालातून दिसून येते. त्यामुळे पोलीस कारवाईबाबत आयोग असमाधानी आहे. या मारहाण प्रकरणी उपलब्ध असलेल्या स्वयंस्पष्ट पुराव्यांच्या आधारे तपास करून चार दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.