मुंबई : नायर रुग्णालयातून गुरुवारी संध्याकाळी पाच दिवसांचे बाळ चोरी करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. बाळाची प्रकृती बरी आहे की नाही याच्या तपासणीसाठी बाळ चोरी करणारी महिला त्याला घेऊन सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात तपासणीसाठी गेली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बाळाची चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अवघ्या काही तासांतच या प्रकरणी हेजल डोनाल्ड कोरिया (३७) या महिलेला अटक करत बाळाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.
बाळ चोरीप्रकरणी हेजलला व्ही. एन. देसाई रुग्णालयातून अटक करण्यात आल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश आव्हाड यांनी सांगितले. आरोपी महिला पालघरच्या कर्नाळा परिसरात पतीसह राहते. तिला एक मुलगी आहे. बाळ चोरीच्या उद्देशानेच ती नायर रुग्णालयात गेल्याचे तिने वाकोला पोलिसांना सांगितले. बाळाची आई शीतल रमेश साळवी (२८) या झोपल्याचा फायदा घेत, हेजल वॉर्र्ड क्रमांक ७ मध्ये शिरली आणि अलगद बाळाला उचलून तिने पोबारा केला. साळवी यांना जाग आली, तेव्हा बाळ गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करत रुग्णालय प्रशासनाला याची माहिती दिली. सर्वत्र शोधाशोध करत अखेर आग्रीपाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली. रुग्णालयातील सीसीटीव्ही पोलिसांनी पडताळले व बाळाला पळणाºया हेजलचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले.अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यातच्हेजल नायर रुग्णालयातून बाळ घेऊन पळाली. मात्र, बाळाची प्रकृती बरी आहे की नाही याच्या तसेच स्वत:च्याही तपासणीसाठी ती संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पतीसह बाळाला घेऊन तपासणीसाठी सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात गेली. बाळाला वॉर्ड क्रमांक ७ मध्ये दाखल करण्यात आले. या वॉर्डची जबाबदारी रात्रपाळीवर असलेल्या नर्स भक्ती तरे यांच्यावर होती. ‘११ जून, २०१९ रोजी विरारच्या घरीच बाळाला जन्म दिला असून, माझी प्रसूती मेरी नावाच्या महिलेने केली. त्यामुळे मला माझी आणि बाळाची तपासणी करायची आहे,’ असे हेजलने सांगितल्याचे तरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.च्बाळाची नाळ, तसेच महिलेची अवस्था पाहून भक्ती तरे यांना संशय आला. त्याच वेळी भक्ती यांचे पती देवेंद्र तरे यांनी फोन करून नायरमधून बाळ चोरीला गेल्याचे त्यांना सांगितले. भक्ती यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांना सीसीटीव्ही आणि बाळाचे फोटो पाठविले. नवºयाने पाठविलेल्या बाळाच्या आणि महिलेच्या फोटोमध्ये साम्य असल्याचे लक्षात येताच भक्ती यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले.च्डॉक्टरांनी हेजलची सोनोग्राफी केली असता, तिची प्रसूती झालीच नसल्याचे उघडकीस आले.