मीरा रोड : कबुतरांची विष्ठा, पिसे आदींमुळे मानवाला गंभीर आजार होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अशात मीरा रोडमध्ये एका ६९ वर्षीय वृद्ध नागरिकाने कबुतरास दाणे टाकू नका म्हटले म्हणून त्यांना मारहाण, तसेच त्यांच्या मुलीचा गळा दाबून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. ३) सकाळी घडली आहे.मीरा रोडच्या ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारत ३० मध्ये राहणारे महेंद्र पटेल (६९) हे रविवारी सकाळी दूध आणण्याकरिता गेले होते. त्यावेळी बाजूच्या इमारत क्रमांक २९ मध्ये राहणारा आशा व्यास (५६) ही महिला इमारतीच्या सार्वजनिक परिसरात कबुतरांना दाणे टाकत होती. पटेल यांनी कबुतरांना दाणे टाकू नका, असे म्हटले म्हणून त्या महिलेने त्यांना शिवीगाळ सुरू केली. हा गोंधळ ऐकून पटेल यांची मुलगी प्रेमल (४६) इमारतीच्या खाली आल्या. वडिलांना शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली असता, व्यास हिने प्रेमलला शिवीगाळ सुरू केली.चौघांविरोधात गुन्हा दाखलव्यास यांच्या इमारतीत राहणारा सोमेश अग्निहोत्री हा दोन अनोळखी लोकांसह इमारतीखाली आला व त्याने प्रेमल यांना लोखंडी रॉडने मारले; तर एकाने त्यांचा गळा दाबला व हाताने मारहाण केली. या घटनेप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आशा व्यास, सोमेश अग्निहोत्री व अन्य दोन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केल्याने गळा दाबून महिलेला मारहाण; चौघांचे कृत्य; घटनेत लोखंडी रॉडचा केला वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:25 IST