Without social media, 5 percent of youths feel lonely! | सोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे!

सोशल मीडियाविना ५१ टक्के तरुणाईला वाटते एकटे!

- सीमा महांगडे 

मुंबई : ‘एक बाकी एकाकी’ अशीच अवस्था शहरातील तरुणाईची सोशल मीडियाविना होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सोशल मीडियाचा वापर केला नाही तर शहरातील ५१ टक्के तरुणाईला आपण एकटे आहोत असे वाटत असल्याचे समोर आले आहे. तर ७७ टक्के तरुणाई फेक म्हणजेच बनावट आयुष्य या माध्यमातून जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील १६ ते २५ वयोगटातील १००० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आणि त्यांना सोशल मीडियाचा त्यांच्या आयुष्यावरील परिणाम, परिणाम करणारे घटक काही प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्वेक्षण आणि त्याच्या निकालासाठी या विद्यार्थ्यांना तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे. वैयक्तिक पातळीवर तरुणाईचे एकमेकांशी संभाषण नसल्याने सोशल मीडियावर आपल्या चिंता आणि भावना व्यक्त करत असतात. त्यामुळे सोशल मीडियाशिवाय त्यांना एकटेपणाची भावना निर्माण होत असल्याचे यातून समोर आले आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या तरुणाईपैकी ५२ टक्के तरुणाईला त्यासंदर्भातील तक्रार निवारणासाठी आवश्यक धोरणांची माहितीच नसल्याचे उघड झाले आहे. २९ टक्के तरुणाईला जरी या धोरणांबत माहिती असली तरी ती कशी वापरली जायला हवीत किंवा काय आहेत यासंबंधी माहिती नाही.

७९ टक्के तरुणाई ही रोज सोशल मीडियाचा वापर करते तर ३३ टक्के तरुणाई दिवसातील २ ते ३ तास सोशल मीडियावर घालवतात. तर ४५ टक्के विद्यार्थी आपल्याला सोशल मीडियावरील लाइक्स आणि फॉलोअर्स पाहून बरे वाटत असल्याचे मान्य करतात. सोशल मीडियाचा आपल्या शैक्षणिक आयुष्यावर किंवा नातेसंबंधावर कोणताही परिणाम होत नसल्याचे ४० टक्के तरुणाई सांगत असली तरी तितकीच तरुणाई आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींवर याचा परिणाम होत असल्याचे मान्य करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

धोरण तयार करण्याची विनंती
इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक अवकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झेविअर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला आहे. तसेच अहवाल त्यांनी सायबर क्राइम विभागाचे आयपीएस ऑफिसर बालसिंग राजपूत यांच्याकडे सोपविला आहे. या अहवालावरून जी माहिती समोर आली आहे त्यातून सोशल मीडियाचा आजच्या तरुणाईवरील परिणाम आणि त्यासाठी आवश्यक असे धोरण तयार करण्याची विनंतीही केली आहे.

समाज माध्यमांमुळे प्रत्येकाचे जग छोटे छोटे बनत आहे. या आभासी जगामागील खरी वास्तविकता विद्यार्थ्यांना समजावणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता.
- अवकाश जाधव, इतिहास विभागप्रमुख, झेविअर्स महाविद्यालय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Without social media, 5 percent of youths feel lonely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.