Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 07:33 IST

मुंबईतील अनेक बंडखोरांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून, काहींना ‘ऑन द स्पॉट’ पक्षात बढतीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. दादरमध्ये बंडखोरी करणारे भाजपचे महामंत्री गजेंद्र धुमाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य सन्मान राखण्याचे आश्वासन दिल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मुंबई  : महामुंबईत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी बंडखोरांची मनधरणी करताना भाजप-शिंदेसेना व उद्धवसेना-मनसेची चांगलीच धावपळ झाली. मुंबईतील अनेक बंडखोरांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून, काहींना ‘ऑन द स्पॉट’ पक्षात बढतीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. दादरमध्ये बंडखोरी करणारे भाजपचे महामंत्री गजेंद्र धुमाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य सन्मान राखण्याचे आश्वासन दिल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुसरीकडे उद्धवसेनेलाही अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. प्रभाग ४३ चे बंडखोर समृद्ध शिर्के यांनी अर्ज मागे घेतला असून, अन्य बंडखोरांचे मन वळविण्यात पक्षाला यश आले नाही. 

भाजपचे निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार व मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम यांनी बंडखोरांच्या घरी, कार्यालयास प्रत्यक्ष भेटी मनधरणी केली. कुलाबामधील एका बंडखोर उमेदवारास आ. साटम यांनी चिराबाजार-काळबादेवी मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले. तर प्रभाग १७३ च्या बंडखोर शिल्पा केळूसकर यांनी अर्जासोबत पक्षाच्या एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडली होती. त्यामुळे आ. साटम यांनी त्यांचा अर्ज बाद करण्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले. माजी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी शेलार, साटम यांच्या चर्चेनंतरही प्रभाग ६० मधून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

आ. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेतील उद्धवसेनेचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी (१९३), श्रावणी देसाई (१९७) व संगीता जगताप (१९६) यांनी अर्ज कायम ठेवले. १६९ मधून प्रवीणा मोरजकर व कमलाकर नाईक हे माजी नगरसेवक आमनेसामने आले आहेत.

माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासमोर आव्हान -उद्धवसेनेचे शाखाप्रमुख विजय इंदूलकर यांनी प्रभाग २०२ मधून अर्ज कायम ठेवल्याने माजी महापौर श्रद्धा जाधव यांना तुल्यबळ लढतीला सामोरे जावे लागणार आहे. मनसेच्या सुप्रिया दळवींना प्रभाग २०५ मधून उद्धवसेनेच्या दिव्या बडवे यांनी आव्हान दिले आहे. ११४ मधून मनसेच्या मनीषा आजगावकर यांनी उद्धवसेनेच्या राजोल पाटील यांच्याविरोधात अर्ज कायम ठेवला आहे. 

चांदिवली, गोरेगावमध्ये राजीनामा सत्र -चांदिवलीतील प्रभाग १५७, १५९, व १६१ येथील उद्धवसेनेच्या शाखाप्रमुखांनी बाहेरूचे उमेदवार दिल्याच्या नाराजीतून राजीनामे दिले आहेत. तर प्रभाग ३७ मध्येही प्रभागाबाहेरील पदाधिकाऱ्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने नाराजी पसरली आहे. येथे इच्छुक पूजा चौहान यांच्या नाराजीनंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली.

शिंदेसेनेतही बंडखोरी -शिंदेसेनेचे विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर व माजी शाखाप्रमुख सुनील बोले यांनी ५९ या एकाच प्रभागातून उमेदवारी अर्ज कायम ठेवले. तर शीतल बित्रा (९७),  संजय अगलदरे (९९) यांनीही अर्ज मागे घेतले नाहीत. गोरेगाव विधानसभेतील प्रभाग ५४ भाजपला  सोडल्याने विधानसभाप्रमुख गणेश शिंदे, महिला उपविभागप्रमुख सोनल हडकर यांच्यासह २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion quelled: BJP succeeds, Uddhav Sena fails in candidate withdrawals.

Web Summary : BJP successfully persuaded rebels to withdraw nominations, offering promotions. Uddhav Sena faced internal strife, failing to convince all rebels. Shinde Sena also saw rebellion. Resignations in Chandivali and Goregaon highlight discontent over candidate selection, impacting key contests.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेभाजपाशिवसेनामहानगरपालिका निवडणूक २०२६