वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी यंत्रणा १० मेट्रोस्थानकांवर उभारणार; ‘एमएमएमओसीएल’ने पूर्ण केली पावसाळ्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 07:19 IST2025-05-29T07:19:24+5:302025-05-29T07:19:24+5:30

१० महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘विंड व्हेलॉसिटी ॲनिमोमीटर’ ही यंत्रणा बसविण्यात आली आहे

Wind speed measuring system to be installed at 10 metro stations | वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी यंत्रणा १० मेट्रोस्थानकांवर उभारणार; ‘एमएमएमओसीएल’ने पूर्ण केली पावसाळ्याची तयारी

वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी यंत्रणा १० मेट्रोस्थानकांवर उभारणार; ‘एमएमएमओसीएल’ने पूर्ण केली पावसाळ्याची तयारी

मुंबई : पावसाळ्यात मेट्रोची वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी महामुंबईमेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार अंधेरी पश्चिम ते दहीसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहीसर मेट्रो ७ मार्गिकेवर १० महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘विंड व्हेलॉसिटी ॲनिमोमीटर’ ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यातून हवामानाच्या चालू स्थितीची माहिती मिळू शकेल. त्याचा उपयोग मेट्रो  संचालनाबाबतची निर्णयक्षमता वाढविण्यासाठी होणार आहे. 

एमएमएमओसीएलने मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांसाठी व्यापक पावसाळी उपाययोजना आराखडा तयार केला आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. खड्डे भरण्याची वाहने आणि पाणी उपसण्यासाठीचे पंप महत्त्वाच्या ठिकाणी आधीच तैनात करण्यात आले आहेत. पादचारी आणि वाहनांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो स्थानकांभोवती ट्रॅफिक वॉर्डन नेमले आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यात आपत्कालीन गोष्टी हाताळण्यासाठी प्रगत पावसाळी नियंत्रण कक्ष २४ बाय ७ कार्यरत केला आहे. कक्षात थेट लाइव्ह मॉनिटरिंगची सुविधा आहे. हा कक्ष मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडण्यात आला आहे. नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक १८००८८९०५०५ / ०८०८ आणि ८४५२९०५४३४ वर संपर्क साधता येईल, अशी माहिती ‘एमएमएमओसीएल’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

या उपाययोजना केल्या

पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये मेट्रो सेवेच्या फेऱ्या वाढविल्या.

प्रत्येक मेट्रो स्थानकात किमान ६४ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे.

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसादासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी स्वतंत्र इमर्जन्सी कोच सज्ज.

डीजी सेट्स, यूपीएस यंत्रणा, लाइटनिंग अरेस्टर्स, आर्थिंग सिस्टम्स आणि डी वॉटरिंग पंप यांची काटेकोर तपासणी आणि चाचणी करून ३० स्थानके, चारकोप डेपो येथेही साधनसामग्री सज्ज.
 
सर्व ३४ मेट्रो गाड्यांची सखोल वॉटरप्रूफ चाचणी, मुसळधार पावसातही गळती होणार नाही, याची खातरजमा पूर्ण.

मेट्रोच्या ३५ किमीच्या व्हायाडक्टची स्वच्छता पूर्ण. रूफ गटर्स, सॉसर ड्रेन्स, मेडियन चेंबर्स आणि ३० स्थानकांवरील ड्रेनेज लाइनची साफसफाई.

आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थिती उद्भवली, तर दोन्ही मार्गिकांवर तत्काळ सेवेत आणता येतील अशा राखीव मेट्रो गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. मुसळधार पावसातही मेट्रो नियंत्रित वेगाने सुरळीत चालू राहील - डॉ. संजय मुखर्जी, अध्यक्ष, एमएमएमओसीएल, महानगर आयुक्त 
 

Web Title: Wind speed measuring system to be installed at 10 metro stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.