पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जीव वाचला; कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:30 AM2019-07-24T02:30:36+5:302019-07-24T06:59:55+5:30

वांद्रेच्या एमटीएनएल कार्यालयाची आगीमुळे दुरवस्था

The wind blowing from the west saved lives; | पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जीव वाचला; कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया

पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जीव वाचला; कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया

Next

खलील गिरकर 

मुंबई : पश्चिमेकडून वाहणाºया वाºयामुळेच जीव वाचला, अशी प्रतिक्रिया सोमवारी वांद्रे येथील एमटीएनएल कार्यालयात लागलेल्या आगीतून सुखरूप बचावलेल्या कर्मचाºयाने दिली आहे.

आग लागल्यानंतर आम्ही चौघे जण चौथ्या मजल्यावरील खिडकीमध्ये जमलो होतो. मोठ्या प्रमाणात पसरलेल्या धुरामुळे जिन्याने टेरेसवर जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. खिडकीतून आतील बाजूस गेल्यास गुदमरण्याचा धोका होता. त्यामुळे आम्ही सुमारे पाऊण तास तिथे होतो. नंतर अग्निशमन दलाने आम्हाला सुरक्षितपणे खाली उतरवले. मात्र या कालावधीत पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे वाहणाºया वाºयामुळे धूर आमच्यापासून दूर जात होता. वाºयाची दिशा उलट असती तर धूर आमच्या दिशेने येऊन आम्ही गुदमरण्याचा धोका होता, अशी आठवण एका कर्मचाºयाने सांगितली.

दरम्यान, सोमवारी दुपारपर्यंत इतर कार्यालयांप्रमाणे वर्दळ व गजबजाट असलेल्या एमटीएनएलच्या वांद्रे पश्चिम येथील इमारतीत मंगळवारी विरुद्ध परिस्थिती होती. वातावरणात सर्वत्र भरून राहिलेला भकासपणा, इमारतीत सर्व मजल्यांवर वाहत असलेले पाणी, सर्वत्र रिकामी दालने, जळलेली, भिजलेली कागदपत्रे असे पाहायला मिळाले.

इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ घोळका करून राहिलेले कर्मचारी, अधिकारी यांच्यामध्ये या इमारतीला लागलेल्या आगीचा मोठा धक्का बसल्याचे चित्र होते. आगीमुळे मोठा मानसिक धक्का बसल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

एमटीएनएलची खंडित सेवा ४८ तासांत होणार पूर्ववत
वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील सुमारे २० हजार टेलिफोन व ब्रॉडबँड सेवेवर त्याचा परिणाम होऊन या सेवा ठप्प झाल्या आहेत. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्नशील असून येत्या २४ ते ४८ तासांत सेवा पूर्ववत करण्यास यश मिळेल, असा विश्वास एमटीएनएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार यांनी व्यक्त केला. मंगळवारी इमारतीच्या नुुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

वांद्रे पश्चिम येथे एमटीएनएल इमारतीला सोमवारी आग लागली होती. पुरवार यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देत आगीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. पश्चिम १ विभागाच्या महाव्यवस्थापक नीता अस्पात या वेळी उपस्थित होत्या. आगीची घटना अत्यंत दुर्दैवी असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. पूर्ण क्षमतेने कार्य करून या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी महाव्यवस्थापक (ट्रान्समिशन) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती आगीमागील कारणांचा शोध घेऊन त्यासंदर्भातील अहवाल लवकरच सादर करेल, असे पुरवार म्हणाले.
आगीमुळे बंद पडलेली सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, महाव्यवस्थापक नीता अस्पात यांनी सांगितले की, सोमवारच्या घटनेमुळे कर्मचाºयांना धक्का बसला आहे. कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देऊन कामावर आले आहेत. मात्र, इमारतीमध्ये प्रवेश करण्यास बंदी असल्याने कर्मचारी प्रवेशद्वाराजवळ उभे होते.

सेवा पुस्तके आगीत नष्ट
इमारतीत पश्चिम १ विभागाचे प्रशासकीय कार्यालय व मुख्यालय असल्याने वांद्रे ते अंधेरी परिसरातील एमटीएनएल कर्मचारी, अधिकाºयांच्या सेवेबाबतची कागदपत्रे, सेवा पुस्तके येथे ठेवली होती. आगीत ती जळाली आहेत तर काही पाण्यात भिजून खराब झाली आहेत. बॅटरी रूमचेदेखील यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. मदतकार्य करताना सेल्फी घेणाºया व्यक्तीविरोधात या वेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

सर्वत्र पाणी व जळाल्याचा कुबट वास
इमारतीमध्ये कुलिंग आॅपरेशन राबवत असलेले मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी कर्तव्य बजावत होते. दुसरीकडे एमटीएनएलचे कर्मचारी मात्र आगीमुळे कर्तव्यावर रुजू होऊ शकत नव्हते. अनेक जण इमारतीच्या बाहेर उभे राहून हतबल होऊन इमारतीची दुरवस्था पाहत होते. संपूर्ण इमारतीत काळोख, जळालेल्या फाईल्स, सर्वत्र पाणी तसेच जळाल्याचा कुबट वास पसरला होता.

Web Title: The wind blowing from the west saved lives;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.