नालेसफाई न झाल्यास सायनजवळ रेल्वे रुळांवर पाणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:21 IST2025-05-26T12:21:08+5:302025-05-26T12:21:20+5:30
नालेसफाई करताना संरक्षक भिंतीला धक्का बसल्याने तेथील घरे कोसळल्याचा आरोप

नालेसफाई न झाल्यास सायनजवळ रेल्वे रुळांवर पाणी?
खलील गिरकर
मुंबई: सायन येथील सोमय्या मैदानाजवळील नालेसफाई न झाल्यास रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मैदानाजवळील जय भारतमातानगर येथील चाळीतील काही घरांची नुकतीच पडझड झाली. नालेसफाई करताना संरक्षक भिंतीला धक्का बसल्याने तेथील घरे कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यानंतर स्थानिकांनी नालेसफाईला विरोध केला होता. मात्र, त्याचा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे.
याबाबत उद्धवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे म्हणाले, हा नाला के. जे. सोमय्या ट्रस्ट अंतर्गत आहे. याठिकाणची संरक्षक भिंत जुनी झाली आहे. काही दिवसांपूर्वी तेथील भिंतीच्या शेजारील घरे पडली. त्यामुळे स्थानिकांनी नालेसफाईला विरोध केला. हा नाला अद्याप मुंबई पालिकेकडे हस्तांतरित केलेला नाही. हा अंतर्गत नाला आहे. हा नाला पुढे माहुल क्रिक नाल्याला जोडला जातो. त्यामुळे तो योग्यरीत्या साफ न झाल्यास सायन येथील सरदारनगर, तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचून त्याचा फटका मुंबईकरांसोबत प्रतीक्षानगर व परिसराला बसण्याची भीती आहे.
प्रशासनाने गंभीर दखल घ्यायला हवी
योग्य नालेसफाई न झाल्यामुळे पाणी तुंबण्याच्या अनेक तक्रारी येतात. नालेसफाईस विरोध झाल्याने नाल्यातील कचरा तसाच राहिल्यामुळे स्थानिक रहिवासीच नव्हे तर त्याचा फटका रेल्वेवाहतुकीला बसण्याची भीती आहे. पालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नालेसफाई होईल व मुंबईकरांना दिलासा मिळेल, असे काम करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.