Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवणार का, संख्याबळ कसं जुळवणार? संजय राऊतांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 13:09 IST

Uddhav Thackeray MLC Election : उद्धवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. शिवसेनेचे संख्याबळ कमी असून, ते पुन्हा निवडणूक लढवणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील नऊ आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यातील काही आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत. पण, यात मुख्य मुद्दा चर्चेत आहे तो उद्धव ठाकरे यांचा. ते उद्धवसेनेचे संख्याबळ कमी आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या मदतीने ते पुन्हा विधान परिषदेत जाणार का? याबद्दलच पक्षाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यांनी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेत जावे, असे सांगत संख्याबळ जुळवण्याबद्दलही माहिती दिली.    

खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत आहे. ते पुन्हा विधान परिषदेवर येणार का? त्यासाठी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल, अपक्षांची मदत घ्यावी लागेल. काय आहे? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. 

उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का?

खासदार राऊत म्हणाले, "एकमेकांना मदत महाविकास आघाडीत करावीच लागते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि आमची शिवसेना आहे. त्याच्यामुळे यापुढच्या विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल. तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील."

"आम्ही उद्धव ठाकरेंनाही विनंती केलेली आहे. आम्ही सगळ्यांनी की, आपण राज्याच मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणे, हे राज्यासाठी, जनतेसाठी आवश्यक आहे. त्यांनी जावे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे", अशी संजय राऊतांनी माहिती दिली. 

राऊत म्हणाले, "मोदी, शाहांचा क्लास घ्या"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम, जात, धर्म हे एकत्र असले, तरी आपण सगळे राष्ट्र म्हणून हिंदूच आहोत, असे विधान केले आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारण्यात आले. 

खासदार राऊत म्हणाले, "हे त्यांनी नरेंद्र मोदींना सांगावं. त्यांचा क्लास घ्यावा. अमित शाहांचा क्लास घ्यावा. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे कॅबिनेटमध्ये मुले आहेत, त्यांचा वर्ग घ्यावा आणि त्यांना सांगावं", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

"मुंबईच्या महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे"

मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी मुंबई बांगलादेशी मुक्त करु असे विधान केले. त्याबद्दल संजय राऊत म्हणाले, "महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेशी मुक्त करण्याचे जे काही त्यांचे धोरण आहे, ते त्यांच्या हातात नाही. ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात."

"घुसखोर बांगलादेशींना देशातून हाकलायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याचे जे राजकारण करत आहेत, ते चुकीचे आहे. नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना महापौरांनी भेटले पाहिजे आणि बांगलादेशबद्दलची त्याची भूमिका काय, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे", असा टोला संजय राऊतांनी मुंबईच्या महापौरांना लगावला. 

"बांगलादेशात हिंसक दंगली सुरू आहे. त्यात साडेचारशे हिंदू मंदिरे पाडली. हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या. जवळजवळ २३० ते २४० हिंदूंची हत्या झाली. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री एक अक्षरही बोलत नाही. उलट भारताच्या अर्थसंकल्पात हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपयांची मदत केली आहे. मी तुम्हाला आकडा सांगेन. हे हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिलेत का?", असा संतप्त सवाल राऊत यांनी महापौर आणि केंद्र सरकारला केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Will Uddhav Thackeray contest council election again? Raut answers.

Web Summary : Sanjay Raut says Uddhav Thackeray should rejoin the Legislative Council. MVA partners must cooperate for future elections. He criticized the central government's silence on Bangladesh violence and aid to Bangladesh. He also targeted Mumbai's mayor on Bangladeshi migrants issue.
टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतविधान परिषद निवडणूक 2024शिवसेनामहाविकास आघाडी