महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:44 IST2025-10-03T06:43:53+5:302025-10-03T06:44:12+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फूल, दोन हाफ असा उल्लेख करून ते म्हणाले की यांच्या सरकारने मुंबई महापालिकेला सव्वादोन लाख कोटी रुपयांच्या तुटीत नेले आहे.

महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
मुंबई : आमचा महापौर झाला तर खानच होईल, अशी टीका भाजपवाले करत आहेत अन् त्यांचा झाला तर काय? जानवे, शेंडी ठेवून समर्पजामी म्हणत मुंबई अदानींच्या पायावर ठेवणार आहात का? असा खोचक टोला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवरील पक्षाच्या दसरा मेळाव्यात भाजपला हाणला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फूल, दोन हाफ असा उल्लेख करून ते म्हणाले की यांच्या सरकारने मुंबई महापालिकेला सव्वादोन लाख कोटी रुपयांच्या तुटीत नेले आहे. यांनी गेल्या काही वर्षांत काय काय केले याची श्वेतपत्रिका आम्ही महापालिकेत सत्तेत येताच काढू.
आमच्या योजनांचे श्रेय आताचे सरकार घेत आहे. कोस्टल रोड आम्ही आणला. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन मी आणि पवार साहेबांनी केले. आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. आदित्यने मुंबई २४ तास सुरू राहिली पाहिजे अशी भूमिका घेतली तेव्हा ‘नाइट लाइफ’ मुंबईत आणणार म्हणून ज्या भाजपवाल्यांनी टीका केली त्यांच्याच सरकारने काल दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आदेश काढला, मुंबई हे कधीही न झोपणारे शहर आहे, असे आदित्य सांगत असताना ते टीका करत होते, आता कुठे गेली साधनशुचिता, असा सवालही ठाकरे यांनी केला.
आता भाजपचा महापौर झालाच पाहिजे असे अमित शाह म्हणत आहेत. निवडणूक आली म्हणून हिंदू-मुस्लीम करत आहेत. मुंबईच्या भरवशावर खिसा भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाहीच, असेही ठाकरे म्हणाले.
पलीकडचे राज ठाकरे यांचे शिवतीर्थही आपलेच : संजय राऊत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पेटवलेल्या ठिणगीचा वणवा झाला आहे. कितीही पाऊस आला तरी तो विझणार नाही. शिवतीर्थावर अनेक मेळावे झाले. हे शिवतीर्थ आपले आहेच. त्यापलीकडे असलेले दुसरे शिवतीर्थही (राज ठाकरे यांच्या घराचा नावाचा उल्लेख करत) आपलेच मानले पाहिजे, असे सांगून खा. संजय राऊत यांनी शिवसेना हिसकावून घेणारे पूजेसाठी अमित शहांचे जोडे आणतात, अशी टीकाही केली.
शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी लढा उभारणार : अंबादास दानवे
राज्यात दीड महिना अतिवृष्टीने थैमान घातले असून शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या असह्य वेदना झोपेत असलेल्या सरकारला दिसते की नाही, हा सवाल करत माजी विराेधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यव्यापी मोठा लढा उभारणार असून, गरज पडल्यास मंत्रालयात घुसून सरकारला मदत द्यायला भाग पाडू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
खास क्षण
>दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी स्वागत करत मिठाई देऊन तोंड गोड केले. दसऱ्यानिमित्त त्यांनी शिवसैनिकांना आपट्याची पाने देत शुभेच्छा दिल्या. त्यांनी संवाद साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या भेटीमुळे आनंद झाला असून दोन्ही भावांनी कायम एकत्र रहावे, अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली.
> संबळ, नाशिक बाजा, डीजेच्या तालावर नाचत-वाजतगाजत शिवसैनिकांचे शिवाजी पार्कवर आगमन. भगवे उपकरणे, मशाल, खांद्यावर पिशवी, दुसऱ्या हातात बॅग घेतलेला ग्रामीण भागातून आलेल्या शिवसैनिकांची गर्दी.
> पाऊस कोसळत असल्यामुळे ओल्याचिंब अवस्थेत शिवसैनिक मैदानावर दाखल. मैदानातील चिखलातच शिवसैनिकांचे ठाण. काहींचा छत्र्यांच्या आधार घेत, पावसात भिजत उद्धव ठाकरेंच्या भाषणाला टाळ्या आणि घोषणांनी प्रतिसाद.
> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भेटीचा फोटो असलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधत होता. त्या बॅनरखाली उभे राहून अनेक शिवसैनिकांनी फोटो काढले, सेल्फी घेतल्या.
> मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळील मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ महिलांनी गर्दी केली होती. शिवाजी पार्क परिसर बॅनर, भगव्या झेंड्यांनी व्यापला.
> शिवसेना भवन ते शिवाजी पार्कदरम्यान भगवे उपरणे, की-चेन, बिल्ले, बाळासाहेबांचे छायाचित्र असलेली पेन, भगव्या शाली, स्टिकर्स आदी विविध वस्तू दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. शिवसैनिक उत्साहाने खरेदी करत होते.
> पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहकुटुंब ६.४५ वाजता शिवतीर्थावर आगमन. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर ठाकरे यांच्याकडून चाफ्याची फुले अर्पण.