मेट्रो प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ? भाडे निर्धारण समिती स्थापन करण्यासाठी पाठवला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 10:45 IST2025-08-23T10:45:01+5:302025-08-23T10:45:17+5:30
‘एमएमआरडीए’कडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे

मेट्रो प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ? भाडे निर्धारण समिती स्थापन करण्यासाठी पाठवला प्रस्ताव
अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंधेरी (प.) ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवास भाडे वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाडे निर्धारण समितीचे गठित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे या महिन्यात पाठविला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देताच पुढे केंद्राला ही समिती स्थापन करण्यासाठी शिफारस केली जाणार आहे.
एमएमआरडीएच्या अखत्यारितील महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) ३५.१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाते. एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवरून सद्य:स्थितीत दरदिवशी ३ लाखांहून अधिक जण प्रवास करतात. या मेट्रोच्या प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षीत त्यांच्यावरून ९ लाख प्रवासी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र प्रवासी संख्येच्या आकड्यापासून या मेट्रो अजून दूर आहे.
परिणामी मेट्रोला अपेक्षित उत्पन्न मिळत नसून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच मेट्रो मार्गिकांचे भाडे एमएमआरडीएच्या मेट्रोपेक्षा अधिक आहे. परिणामी मेट्रोचा तोटा भरून काढण्यासाठी आता एमएमएमओसीएलकडून प्रवासी भाडेवाढीचा विचार केला जात आहे.
अशी आहे भाडेवाढीची प्रक्रिया
एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत या मेट्रो मार्गिकेवर भाडेवाढ करण्यासाठी भाडे निर्धारण समिती गठीत करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास मान्यता देण्यात आली होती. केंद्राच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित केली जाणार आहे. ही समिती भाडेवाढीबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे त्याची शिफारस करेल. त्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच भाडेवाढ लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
पहिल्या भुयारी मार्गिकेवर आकारले जाते सर्वाधिक भाडे
- मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर सर्वाधिक भाडे आकारले जात आहे.
- एमएमआरडीएच्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवर प्रती ३-१२ किमीसाठी २० रुपये भाडे आकारले जाते.
- त्याचवेळी मेट्रो ३ मार्गिकेवर ८-१२ किमी अंतरासाठी ४० रुपये भाडे आकारले जात आहे.
- मेट्रो १ मार्गिकेवर ८ ते ११.४ किमी अंतरासाठी ४० रुपये आकारले जाते.