काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविणार, हर्षवर्धन सपकाळ; काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 05:44 IST2025-02-19T05:43:45+5:302025-02-19T05:44:15+5:30

हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला.

Will take Congress's ideas to every household, Harshvardhan Sapkal Resolves to make Congress Chief Minister | काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविणार, हर्षवर्धन सपकाळ; काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प

काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविणार, हर्षवर्धन सपकाळ; काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प

मुंबई : आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे. पण, कार्यकर्त्यांची एक-एक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करून, काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचवून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा, असा निर्धार काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. बोगसपणा करणाऱ्यांना नव्हे, तर निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच पक्षात संधी दिली जाईल. ही लढाई सोशल मीडियाची, एकमेकांना सल्ला देण्याची नाही. केवळ पुढारी म्हणून मिरवायचे आणि कामाचा पत्ताच नाही, असे आता चालणार नाही, असा इशारा देत पुढील कामाची दिशा कशी असेल, हेदेखील सपकाळ यांनी सूचित केले.

संघटना मजबूत करा - चेन्नीथला

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला; पण, विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीतजास्त जागांवर विजय मिळवा, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री अमित देशमुख, वसंत पुरके, नसीम खान, वर्षा गायकवाड यांचीही भाषणे झाली.

संख्याबळ महत्त्वाचे नाही, तर लढण्याची इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही. जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला पुनर्वैभव आणू.

विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षनेते

हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेचे जे तत्त्वज्ञान आहे तोच काँग्रेसचा विचार आहे. राज्यातील गावागावांत शिबिरे घेऊन विचाराचे वादळ उठवू आणि नव्याने काँग्रेस संघटन उभे करू.

बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते

Web Title: Will take Congress's ideas to every household, Harshvardhan Sapkal Resolves to make Congress Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.