Will Shiv Sena give tough fight to the existing MLA? | Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदाराला शिवसेना देणार का टक्कर?

Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदाराला शिवसेना देणार का टक्कर?

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भायखळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एमआयएमकडून विद्यमान आमदार वारिस पठाण, शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव, काँग्रेसकडून माजी आमदार मधू चव्हाण, तर अखिल भारतीय सेनेकडून नगरसेविका गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


२०१४ साली एमआयएमला या मतदारसंघात विजय मिळाला आणि वारिस पठाण निवडून आले. मात्र, गेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे वारिस पठाण यांना ही निवडणूक सोपी असणार नाही. शिवसेनेने या मतदारसंघात चांगलाच जोर लावला आहे.
या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाला मक्तेदारी निर्माण करता आलेली नाही. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना निवडून दिले. येथील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न या मतदारसंघात आहे. मुस्लीम आणि मराठी मतदारांची संख्या येथे मोठी आहे. त्यांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा या मतदारसंघात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळेच खरा सामना हा एमआयएम आणि शिवसेनेत रंगणार आहे.


जमेच्या बाजू
पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विभागात केलेल्या कामाचा फायदा यामिनी जाधव यांना होऊ शकतो. यापूर्वी यामिनी जाधव या अन्य विभागांतून लढल्यामुळे विस्तारित क्षेत्रातील मतदारांपर्यंत त्या पोहोचल्या आहेत. महिला वर्गासाठी वेगळी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे, तसेच काँग्रेसचे स्थानिक माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनीही सेनेत प्रवेश केल्याने त्या मतांचा धोका टळला आहे.
एमआयएम पक्षाचे अ‍ॅड. वारिस पठाण हे भायखळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४च्या निवडणुकीत मतदारांनी पठाण यांच्या पारड्यात मतांचे दान टाकले आणि त्यांचा विजय झाला. पठाण केवळ १ हजार ३५७ मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे पठाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. पठाण यांनी केवळ मुस्लीमबहुल वस्तीत कामे केल्यामुळे येथील मते त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.

उणे बाजू

ेगेल्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचे आव्हान यंदा या मतदारसंघात आहे. यावेळी अखिल भारतीय सेनेचे अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे मराठी मतदारांच्या मतांवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, तसेच हा मतदारसंघ मुस्लीमबहुल असल्यामुळे त्या मतदारांपर्यंत पोहोचण्यात जाधव यांचा कस लागणार आहे.
यशवंत जाधव यांची पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची दुसरी टर्म असल्यामुळे मागच्या काही काळात स्थानिक पातळीवर त्यांनी कामाचा जम बसविल्याने त्याचा परिणाम वारिस पठाण यांच्या मतांवर होणार आहे. त्याचप्रमाणे, दगडीचाळ नजीक परिसरातील मुस्लीम वस्तीमध्ये गवळी यांची पकड असल्यामुळे येथील मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पठाण यांच्यासमोर आहे.

Web Title: Will Shiv Sena give tough fight to the existing MLA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.