Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चौकशीत माझं नाव आलं तर राजीनामा देईन"; लिपिकाला लाच घेताना अटक, झिरवाळांचे थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:07 IST

लाचखोर लिपिकाच्या अटकेनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

Narhari Zirwal: राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालयातून भ्रष्टाचाराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून थेट मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या कारवाईने राजकीय वातावरणही तापले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने जाळ्यात पकडले. एका तक्रारदाराचा मेडिकल परवाना निलंबित करण्यात आला होता. हा परवाना पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ढेरंगे याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर ३५ हजार रुपयांवर तडजोड झाली आणि ही रक्कम स्वीकारतानाच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात खळबळ

ही कारवाई अधिक चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे नाट्य राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात घडले. एसीबीच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने झिरवाळ यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. तपास पूर्ण होईपर्यंत कार्यालयाचे कामकाज थांबवण्यात आले होते. आरोपी ढेरंगे याने लाचेची मागणी करताना मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नावाचा वापर केल्याची प्राथमिक चर्चा आहे, मात्र एसीबीकडून अधिकृत दुजोरा मिळणे अद्याप बाकी आहे.

मंत्री झिरवाळ यांची आक्रमक प्रतिक्रिया

या प्रकरणानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाही. मंत्री, पीए यांच्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे पूर्वीचे काही गुण होते त्याबद्दल काही सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी जो काही मंत्रालयाचा स्टाफ आहे खूप बारकाईने तपासूनच माणसे दिली आहेत. त्याची कधीही तक्रार आली नव्हती पण त्याने काल काय प्रकार केला त्याबाबत सांगता येणार नाही. त्याने जी हिंमत केलीय त्यासाठी आता जबाब द्यावा लागेल. तो सरकारी कर्मचारी आहे आणि त्याच्यासाठी ५० हजार रुपये फार आहेत असं नाही. पण त्याने अशा गोष्टी करायला नकोत. जर खरंच त्याच्याशी माझा संबंध सापडला तर राजीनामा देईन.  त्याच्या चौकशीतून काही माझ्यापर्यंत आलं तर मी राजीनामा देईन," असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.

"मला कोणीही टार्गेट करणार नाही कारण माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडलं त्यामुळे शिक्षा भोगावीच लागेल. या प्रकरणावर पक्ष नेतृत्वासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्या कार्यालयाच्या भागात हा प्रकार घडल्याने ते बंद करण्यात आलं आहे. कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती नाही," असेही नरहरी झिरवाळ म्हणाले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मंत्रालयातील या लाचखोरीच्या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, "महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात आता खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू आहे. थेट मंत्र्यांच्या दालनात भ्रष्टाचार होणे हे राज्यासाठी लाजीरवाणे आहे." 

English
हिंदी सारांश
Web Title : Resign if probe links me: Minister after bribery arrest.

Web Summary : Minister Narhari Zirwal challenges allegations after a clerk was arrested for accepting a bribe in his office. Zirwal denies involvement, promising resignation if implicated. Opposition criticizes the government.
टॅग्स :नरहरी झिरवाळमंत्रालयराष्ट्रवादी काँग्रेस